Actress Aruna Irani on Not having Children : एकेकाळी आपल्या सौंदर्यांने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आणि दिग्गज कलाकारांबरोबर काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी होय. अरुणा यांनी आपल्या करिअरमध्ये ५०० पेक्षा जास्त चित्रपट केले. ‘बेटा’, ‘फर्ज’, ‘रॉकी’, ‘बॉबी’ व ‘लव्ह स्टोरी’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. ६० वर्षांहून जास्त काळापासून अभिनयविश्वात सक्रिय असलेल्या अरुणा यांचं करिअर उत्तम राहिलं, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
अरुणा यांना नासिर हुसैन यांच्या ‘कारवां’ चित्रपटातून ओळख मिळाली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अरुणा इराणी यांचे पती लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांचं नाव कुकू कोहली आहे. विवाहित कुकू कोहली यांच्याशी लग्नाचा निर्णय घेणं आणि मूल न होऊ देणं याबद्दल अरुणा एका मुलाखतीत व्यक्त झाल्या होत्या.
“मी एका विवाहित पुरुषाशी लग्न केलंय, ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी आजाराने निधन झाले होते,” असं अरुणा इराणी कुकू कोहली यांच्याशी लग्न केल्यावर ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
नवरा बायकोच्या नात्यात तिसरी व्यक्ती येतेच कशी?
“मला माझ्या पतीच्या पहिल्या लग्नाबद्दल कल्पना नव्हती, अशी बातमी का पसरवली गेली याबद्दल मला माहीत नाही. त्यांची पत्नी मुलांसह सेटवर यायची, लग्न करण्याचा निर्णय आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता. खरं तर बायका, नेहमी पतीच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या महिलांना शिव्या घालतात. पण तुझ्या आनंदाला मी जबाबदार नाही, तो तुझा नवरा आहे. आधी त्याला थांबव, त्याने असं का केलं ते विचार. मी तुमचं घर तोडायला अफेअर थोडीच केलं. त्यांच्या नात्यात तिसरी व्यक्ती येऊच कशी शकते, हे फक्त त्या नवरा किंवा बायकोलाच माहीत,” असं वक्तव्य अरुणा इराणी यांनी केलं होतं.
अरुणा इराणी यांनी मूल का होऊ दिलं नाही?
“विवाहित पुरुषाशी लग्न करणं सोपं नाही. याच कारणामुळे मी आई झाले नाही. कारण जे मी सहन करतेय ते फक्त मीच सहन करू शकते. मी काळजीत, चिंतेत असते ते ठीक आहे, पण माझ्या मुलाने ‘पप्पा कुठे आहे?’ असं विचारलं तर मी त्याला काय उत्तर देऊ? तो या सगळ्यात (कुकू कोहली) अडकेल. समजा माझ्या मुलाला मध्यरात्री काही झालं तर मी त्याला कॉलही करू शकत नाही. म्हणूनच मला मूल असावं असं कधीच वाटलं नाही. जे मी सहन केलंय ते दुःख मी माझ्या बाळाला नको,” असं अरुणा इराणी म्हणाल्या होत्या.