why Gulzar and Rakhee Majumdar part aways: दिग्गज अभिनेत्री राखी मजुमदार यांनी लोकप्रिय गीतकार यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यांची जोडी लोकप्रिय होती. मात्र, ते जेव्हा वेगळे झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला होता. विशेष बाब म्हणजे ते वेगळे झाल्यानंतर ते एकमेकांच्या जास्त जवळ आले होते.
राखी यांनी गुलजार यांच्याशी लग्न करण्याआधी बंगाली चित्रपट निर्माता अजय बिस्वास यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी त्यांचे वय कमी होते; मात्र ते १९६५ साली वेगळे झाले. त्यानंतर त्यांची भेट गुलजार यांच्याशी झाली. त्यांनी १९७३ ला लग्नगाठ बांधली. त्याच वर्षी त्यांना मुलगी झाली. मेघना गुलजार असे त्यांचे नाव आहे. लग्नानंतर राखी यांनी अभिनयात काम करू नये, असे गुलजार यांचे मत होते, असे म्हटले जाते.
गुलजार व राखी वेगळे का झाले होते?
गुलजार यांच्या प्रॉडक्शन हाऊसमुळे अभिनयाला वाव मिळेल, असा विचार राखी यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या. मात्र, गुलजार यांनी सतत विविध चित्रपटांसाठी राखी यांना भूमिका न देता, इतर अभिनेत्रींची निवड केली. तेव्हा राखी यांचा अपेक्षाभंग झाला.
यादरम्यानच अशी एक गोष्ट घडली, ज्यामुळे राखी व गुलजार यांच्यातील दुरावा वाढला. जम्मू आणि काश्मीरमध्ये आँधी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी संजीव कुमार यांनी गैरवर्तन केल्याचे सुचित्रा सेन यांनी म्हटले. वाद वाढू नये म्हणून गुलजार यांनी मध्यस्थी केली आणि ते सुचित्रा सेन यांना त्यांच्या हॉटेलवर घेऊन गेले. गुलजार यांचा हेतू चांगला असला तरी त्यामुळे राखी दुखावल्या गेल्या. राखी यांनी गुलजार यांना प्रश्न विचारले.
असे म्हटले जाते की, हा वाद विकोपाला गेला. राखी यांनी गुलजार यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अभिनेत्रीला मारहाण केली. या घटनेने राखी यांना मोठा धक्का बसला. त्या वादाच्या दुसऱ्या दिवशी यश चोप्रा यांनी राखी यांना ‘कभी कभी’ या चित्रपटातील भूमिकेची ऑफर दिली. गुलजार यांचा विरोध असूनही त्यांनी ती भूमिका साकारली आणि त्या पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करू लागल्या. त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत राखी म्हणालेल्या, “सर्वोत्तम विभक्त जोडपे म्हणून आम्हाला पुरस्कार दिला पाहिजे. वेगळे झाल्यानंतर आम्ही एकमेकांशी उत्तम पद्धतीने जुळवून घेत आहोत. गुलजार व मी एकमेकांसाठी आहोत. मी अजूनही त्याची पत्नी असल्यासारखे तो माझ्याशी वागतो. तो मला फोन करून सांगतो की, मी आज माझ्या घरी चार मित्रांना जेवायला बोलावले आहे; पण घरी जेवण नाही, तर लवकर जेवण बनवून पाठव.”
राखी यांनी असाही खुलासा केला होता की, गुलजार त्यांच्या अनेक चित्रपटांत त्यांच्या खासगी क्षणांचे प्रतिबिंब दिसते. गुलजार आणि राखी यांचे नाते जसे होते, तशा प्रकारची नाती अनेक पात्रं आणि सीनमध्ये दिसतात. आम्ही कित्येक संध्याकाळी क्रिएटिव्ह गोष्टी एकमेकांशी बोलण्यात घालवत असे. गुलजार त्यांच्या गोष्टी मोठ्याने वाचत असत आणि राखी त्या गोष्टी बंगालीमध्ये भाषांतरीत करत असत. जेव्हा गुलजार उशिरा रात्रीपर्यंत लिहीत असत, त्यांना सोबत करण्यासाठी राखीदेखील त्यांच्याबरोबर जाग्या राहायच्या.
राम लखन या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक करण्यासाठी गुलजार यांनी त्यांना फोन केला होता, याची आठवणदेखील त्यांनी सांगितली. सुभाष घई दिग्दर्शित त्या चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ हे महत्त्वाच्या भूमिकात दिसले होते.
दरम्यान, राखी या ‘कभी कभी’, ‘दाग’, ‘शर्मिली’, ‘तपस्या’ अशा चित्रपटांसाठी ओळखल्या जातात.