सिद्धार्थ मल्होत्रा व जाह्नवी कपूर यांच्या भूमिका असलेला ‘परम सुंदरी’ प्रदर्शित होऊन ५ दिवस झाले आहेत. या चित्रपटातील गाण्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय. उत्तर भारतातील एक मुलगा दाक्षिणात्य मुलीच्या प्रेमात पडतो, अशी चित्रपटाची कथा आहे. २९ ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या ‘परम सुंदरी’ने बॉक्स ऑफिसवर ५५ कोटींचा व्यवसाय केला आहे.
जान्हवी व सिद्धार्थचा हा हलका-फुलका रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पंजाबी मुलाची भूमिका सिद्धार्थने उत्तम साकारली आहे. पण जान्हवीचं मल्याळम बोलणं मात्र बऱ्याच प्रेक्षकांना खटकलंय. त्यामुळे चित्रपटाला ट्रोलही केलं जातं आहे. अशातच या चित्रपटातील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.
‘परम सुंदरी’ मध्ये प्रिया प्रकाश वॉरियरची झलक प्रेक्षकांना दिसली. २०१९ मध्ये ‘विंक गर्ल’ म्हणून व्हायरल झालेली प्रिया वॉरियर परम सुंदरीमध्ये बॅकग्राउंट अॅक्टर होती, असं अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे. तिचा पांढऱ्या साडीतील लूक व्हायरल होत आहे.
‘परम सुंदरी’ या चित्रपटातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा (परम) आणि त्याचा मित्र जग्गी गर्दीतून चालत असतात. या दृश्यात सहाय्यक भूमिका साकारणारी मल्याळम अभिनेत्री तन्वी राम देखील दिसत आहे. दरम्यान, चाहत्यांची नजर प्रियावर नजर पडली. ती या स्टार्सच्या मागे उभी दिसतेय. प्रियाने पांढरी साडी नेसली असून लाल रंगाचं ब्लाउज घातलंय.
पाहा फोटो –

२०१९ मध्ये प्रिया प्रकाश वॉरियरला नाव आणि प्रसिद्धी मिळाली होती. ‘ओरु अदार लव्ह’ या चित्रपटातील एका दृश्यामुळे ती व्हायरल झाली होती. यामध्ये ती डोळा मारताना दिसली होती. या एका दृश्यामुळे प्रिया वॉरियर रातोरात नॅशनल क्रश बनली होती. त्यानंतर प्रियाला मुख्य भूमिका असलेले चित्रपट ऑफर होऊ लागले. प्रिया मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते. प्रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.