Zubeen Garg Death Anu Malik Recall Heartfelt Bond : लोकप्रिय आसामी गायक झुबीन गर्गच्या यांच्या निधनाने देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेलेल्या झुबीन यांचा स्कूबा डाइव्हिंगदरम्यान मृत्यू झाला. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमधील अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.
अशातच आता बॉलीवूडचे लोकप्रिय संगीतकार अनू मलिक यांनीही झुबीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसंच आपली भावुक प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. झुबीन यांना काही काळापासून प्रकृतीबाबतच्या काही समस्या होत्या आणि अनु मलिक यांनी त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही दिला होता.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनू मलिक म्हणाले, “झुबीन खूपच प्रेमळ व्यक्ती होते. आसाममधील एका व्यक्तीने माझी आणि त्यांची भेट घडवून आणली होती, मी झुबीन यांना ‘फिजा’ या चित्रपटासाठी गाणं शिकवलं. आमच्यात चांगलं बोलणं व्हायचं. ते त्यांच्या बहिणीबद्दल खूप भावुक होते. एका अपघातात त्यांनी तिला गमावलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की ते आसामी, बंगाली, मणिपुरी आणि मराठीतही गाणी गातात. त्यांचे लाईव्ह कॉन्सर्ट अप्रतिम असायचे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मनाला खूप वाईट वाटलं.”
अनु मलिक पुढे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी झुबीन यांनी मला सांगितलं होतं की, त्यांना अचानक चक्कर येते आहे. त्यावर मी त्यांना ‘डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या’ असं वारंवार सांगायचो. त्यानंतर आमच्यात काही बोलणं झालं नाही. त्यांचा फोनही आला नाही.”
झुबीन गर्ग इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे अनू मलिक म्हणाले की, “ते मुंबईला यायला तयार नव्हते. त्यांना त्यांचं आसाममधील घर प्रिय होतं. मला त्यांचा आवाज, त्यांचं गायन खूपच आवडायचं. पण आता हा आवाज आपल्याला पुन्हा ऐकायला मिळणार नाही, याचं खूप दुःख आहे.”
दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी झुबीन गर्ग यांचे निधन निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘गँगस्टर’ सिनेमातील ‘या अली’ या गाण्यासाठी ते ओळखले जातात. हे गाणं त्या काळात प्रचंड गाजलं होतं आणि झुबिन गर्ग यांना अख्ख्या भारतभर ओळख मिळवून दिली. या गाण्यामुळे त्यांना बॉलीवूडमध्ये खूप यश मिळालं.