Sridevi’s 62nd Birth Anniversary : बॉलीवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार श्रीदेवी आज या जगात नसतील; पण त्यांच्या आठवणी नेहमीच ताज्या राहतील. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती आहे. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवींसाठी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.
बोनी कपूर यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे- हो, तू ६२ वर्षांची झाली नाहीस, तू २६ वर्षांची झाली आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा! आम्ही अजूनही तुमचे सर्व वाढदिवस साजरे करत आहोत.” या पोस्टमध्ये त्यांनी श्रीदेवीच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ लूकचा फोटो शेअर केला आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,”१९९० मध्ये चेन्नईमध्ये श्रीदेवीच्या वाढदिवसाची पार्टी होती. तिच्या २७ व्या वाढदिवसाला मी मुद्दाम तिला ती २६ वर्षांची आहे, असे समजून शुभेच्छा दिल्या. मी तिचे कौतुक केले होते की, ती दिवसेंदिवस तरुण होत आहे; पण तिला वाटले की, मी तिला चिडवत आहे.” या पोस्टबरोबर त्यांनी एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये बोनी कपूर हसत आहेत आणि श्रीदेवी त्यांच्याकडे बोट दाखवीत त्यांना काहीतरी सांगत आहेत.
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे १९९६ मध्ये लग्न झाले. त्यांचे लग्न सीक्रेट होते. बोनी आणि श्रीदेवी यांनी ते जाहीरही केले नव्हते. अनेक महिने लग्न सीक्रेट ठेवल्यानंतर बोनी आणि श्रीदेवी यांनी जानेवारी १९९७ मध्ये लग्न जाहीर केले. बोनी आणि श्रीदेवी यांची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे. दोघेही जान्हवी आणि खुशी या दोन मुलींचे पालक आहेत.
बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची प्रेमकहाणी नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यांची लव्हस्टोरी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. कारण- ते दोघे जेव्हा प्रेमात पडले तेव्हा बोनी यांचे लग्न मोना शौरी कपूरशी झाले होते आणि त्यांना अर्जुन-अंशुला ही दोन मुले होती.
श्रीदेवी यांच्यामुळे बोनी कपूर यांचा पहिला संसार मोडला, असेही आरोप अनेकांनी केले होते. बोनी कपूर यांनी मोना शौरी यांच्याशी १९८३ मध्ये लग्न केले. दोघांचा १९९६ साली घटस्फोट झाला. त्यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्याशी दुसरे लग्न केले.