नाटकाचे प्रयोगपूर्व परिनिरीक्षण बंधनकारक करण्याच्या मुंबई पोलीस कायद्यातील नियमाला अभिनेते-निर्माते अमोल पालेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सार्वजनिक मनोरंजनाची ठिकाणे, जत्रा, तमाशा आदी ठिकाणी केल्या जाणाऱ्या सादरीकरणाला परवानगी देण्यासाठी नियम आखण्याचे अधिकार मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ३३ (१) डब्ल्यू-ए नुसार पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांना आहेत. परंतु हे नियम मनमानी व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा पालेकर यांचा आक्षेप आहे. न्यायालयात ही याचिका सुनावणीसाठी आली तेव्हा नाटकाचे प्रयोगपूर्व परिनिरीक्षणाशी पोलिसांचा संबध काय, असा प्रश्न अनेकांना पडला. सुनावणीदरम्यान ३ मार्च २०१६ रोजी मुंबई पोलीस कायद्यातील दुरुस्तीबाबत अधिसूचना काढण्यात आल्याचे व त्यानुसार नाटकांच्या प्रयोगपूर्व परिनिरीक्षणाची अट रद्द करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारी वकिलांकडून न्यायालयात देण्यात आले. मात्र, नाटकासाठी ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा’कडून प्रयोगपूर्व परिनिरीक्षणाचे बंधन कायम आहे. हे बंधन अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मारक आहे. थोडक्यात नाटकांचे हे सेन्सॉर बोर्ड हवे की नको, असा सवाल करत याचिकेवरील सुनावणी कायम राहणार आहे. त्यानिमित्ताने नाटकांवरील सेन्सॉरशिप संदर्भात..
रंगभूमी प्रयोग निरीक्षण मंडळाची सद्य:स्थितीत आवश्यकता काय?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असायलाच पाहिजे. पण त्यालाही मर्यादा, काही बंधने असलीच पाहिजेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये, समाजावर त्याचा वाईट परिणाम होऊ नये यासाठी मंडळाची आवश्यकता आहे.
या बाबत तपशीलवार माहिती http://www.rangbhumi.org// या संकेतस्थळावर मिळू शकेल.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ
मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत जुलै १९५४ मध्ये सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या लिखाणाचे पूर्वपरीक्षण करण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात आले. सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा (चित्रपट वगळून) आणि मेळे व तमाशा धरून सार्वजनिक ठिकाणी सादर होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम यांना परवानगी देणे व नियंत्रण ठेवण्याचे काम हे मंडळ करते.
मंडळाच्या कामाचा मुख्य उद्देश
* मनोरंजनाच्या कार्यक्रमातून कुठल्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही
* राज्याच्या व देशाच्या सुरक्षिततेस तसेच सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येणार नाही.
* महिलांची अवहेलना होणार नाही याची खबरदारी घेणे.
* लेखन किंवा सादरीकरणातून कोणाची नाहक बदनामी होऊ नये, हा लिखाणाच्या संहितांचे पूर्वपरीक्षण करण्याचा मुख्य उद्देश आहे.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची आता गरज राहणार नाही का?
सार्वजनिक ठिकाणी किंवा बंदिस्त नाटय़गृहात/सभागृहात कार्यक्रम सादर करण्यासाठी मुंबई पोलीस कायद्यानुसार संबंधिताना परवानगी घ्यावी लागत होती, ती आता घ्यावी लागणार नाही. मात्र नाटकाचा प्रयोग सादर करण्यापूर्वी नाटकाची संहिता तसेच करमणुकीच्या कोणत्याही स्वरूपाच्या कार्यक्रमात जे सादर केले जाणार आहे त्याची संहिता किंवा कार्यक्रमात काय सादर केले जाणार आहे त्या लेखनाला पूर्वीप्रमाणेच रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यकच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही.
संहिता पूर्वनिरीक्षणाची पद्धत कशी असते
संहिता सादर केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत त्याबाबत निर्णय कळवला जातो. संहितेतील आक्षेपार्ह भाग वगळण्याची सूचना केली जाते. तसे पत्र लेखकाला पाठविले जाते. लेखकाला आक्षेप/बदल मान्य नसतील तर प्रत्यक्ष चर्चेसाठी बोलावून घेतले जाते. शाळा किंवा महाविद्यालयीन स्पर्धेत कधी कधी आयत्यावेळी एकांकिका लिहिली जाते. त्याची निकड पाहून अशा संहितांना लवकरात लवकर मंजुरी दिली जाते.
किती शुल्क भरावे लागते
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षक मंडळाकडे संहिता मंजुरी/ निरनिराळ्या लेखन प्रकाराच्या मंजुरीसाठीचे शुल्क वेगवेगळे आहे. ते खालीलप्रमाणे
* प्रायोगिक नाटक – २५० रुपये
* व्यावसायिक नाटक-१ हजार रुपये
* एकांकिका- १०० रुपये
* लोकनाटय़/तमाशा- २५० रुपये
* वाद्यवृंद-मराठी – ५०० रुपये
* हिंदी – १ हजार रुपये
* हॉटेल, बार, क्लब/जिमखाना या ठिकाणी चालणारे मनोरंजनाचे कार्यक्रम- ५ हजार रुपये (एक वर्षांसाठी)
* सप्ततारांकित हॉटेल्स (तीन, चार, पाच स्टार) या ठिकाणी चालणारे वाद्यवृंद- ३ हजार रुपये
संकलन- शेखर जोशी