कोकणात एका कामानिमित्त पोहोचलेला छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून विविध फोटो घेत असताना गावातली एक सुंदर तरुणी त्याच्या नजरेस पडते. तिचेही तो अनेक फोटो घेतो, मात्र तिचे ते फोटो पुन्हा पाहताना त्याला एक विचित्र अनुभव येतो. या तरुणीच्या फोटोमागे असं काय गूढ दडलं आहे, याचं उत्तर ‘छबी’ या चित्रपटातून मिळणार आहे. काहीसे रहस्यमय कथानक असलेल्या ‘छबी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे अशा अनुभवी कलाकारांची मांदियाळी असलेला ‘छबी’ हा चित्रपट येत्या २५ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी ‘छबी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून जया तलक्षी छेडा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचं आहे. या चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम असे नव्या दमाचे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मंगेश कांगणे, प्रशांत मडपूवार यांनी लिहिलेल्या गीतांना रोहन-रोहन यांचे संगीत लाभले असून अभय जोधपूरकर रोहन – रोहन यांचा स्वरसाज लाभला आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून रोहन मडकईकर यांनी काम पाहिले आहे. निसर्गसंपन्न कोकणाच्या पार्श्वभूमीवरची एक गूढरम्य कथा सांगणारा ‘छबी’ हा चित्रपट म्हणूनच वेगळा ठरणार आहे.