Chhaava Movie Controversy Director Laxman Utekar Reacts : अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर नेतेमंडळी, सामाजिक संघटना व शिवप्रेमींकडून आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे. या दृश्यांवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. मात्र ही वादग्रस्त दृश्ये आता चित्रपटातून वगळली जातील, असं चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलं. उतेकर यांनी आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच चित्रपटात संभाजीराजे नाचत असल्याचं का दाखवण्यात आलं होतं? याचं कारणही त्यांनी सांगितलं.

वार्ताहरांनी उतेकर यांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज नाचत असल्याची दृश्ये का घेतली होती? त्यावर उतेकर म्हणाले, “आम्ही लेखक विश्वास पाटील यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला आहे. आम्ही अधिकृतरित्या या कादंबरीचे हक्क खरेदी केले आहेत. गेल्या चार वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहोत. इतिहासाला वेगवेगळे पदर असतात. त्यापैकी हा एक भाग आहे. छावा कादंबरीत लिहिलं आहे की संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे. होळीच्या आगीतून नारळ बाहेर काढायचे. चित्रपटात आम्ही महाराजांना लेझीम खेळताना दाखवलं आहे. तो आपला पारंपरिक खेळ आहे. आपल्याला लाज वाटेल असं कोणतंही दृश्य चित्रपटात नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० वर्षांचा राजा खेळ खेळत असेल तर त्यात गैर काय? लक्ष्मण उतेकर

लक्ष्मण उतेकर यांना प्रश्न विचारण्यात आला की चित्रपट बनवताना नेमका काय दृष्टीकोन होता? त्यावर दिग्दर्शक म्हणाले, “महाराज लेझीम खेळले नसतील का? त्यांनी उत्सव साजरा केला नसेल का? छत्रपती संभाजीराजे बुऱ्हाणपूर जिंकून आले तेव्हा ते अवघ्या २० वर्षांचे होते. २० वर्षांचा राजा खेळ खेळत असेल तर त्यात गैर काय? ही माझी भूमिका असली तरी मी शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करतो. या दृश्यांमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही ती दृश्ये डिलीट करू. तो भाग आमच्या चित्रपटापेक्षा मोठा नाही. त्यामुळेच आम्ही तो भाग चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे”.