CM Devendra Fadnavis Reaction on Ranveer Allahbadia Comment: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये (India’s Got Latent) त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं, त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. रणवीरला बॉयकॉट करण्याचीही मागणी होत आहे. आता मुख्यमंत्री फडणविसांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीर अलाबादिया, आशिष चंचलानी व अपूर्व मुखिजा यांनी ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या ताज्या भागात हजेरी लावली. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला.

रणवीर अलाहाबादिया नेमकं काय म्हणाला?

रणवीर स्पर्धकाला म्हणाला, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

रणवीर अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणवीर अलाहाबादियाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्याच्यावर प्रचंड टीका करत आहेत. अनेकांनी त्याने केलेला हा विकृत विनोद असल्याचं म्हटलं आहे. तर, लोकांनीच अशा लोकांना मोठं केलंय त्यामुळे ते पैसे व व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणत्याही खालच्या थराला जाऊ शकतात, अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.