आपल्या खुसखुशीत विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी (२१ सप्टेंबर) सकाळी निधन झाले आहे. ते ५८ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गेल्या १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. विनोद निर्मितीतून ते भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून घराघरांत पोहचले. त्यांनी कलाक्षेत्रातही रचनात्मक असे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

आणखी वाचा :  विश्लेषण : रिक्षाचालक ते स्टँडअप कॉमेडियन, राजू श्रीवास्तवचा प्रवास जाणून घ्या

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. ते अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिले आहेत. त्यांची गणना देशातील सर्वोत्कृष्ट हास्यकलाकारांमध्ये केली जाते. राजू श्रीवास्तव ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चा हिस्साही राहिले आहेत. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.

राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी ‘शक्तीमान’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी का महा मुकाबला’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले.