‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या कार्यक्रमाने घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता म्हणजे कपिल शर्मा. करियरची सुरवात स्टँडअप कॉमेडी ते थेट स्वतःचा कार्यक्रम असा त्याचा प्रवास होता. हजरजबाबीपण, विनोदाचे उत्तम टायमिंग यामुळे तो प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. ‘किस किससे प्यार करू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. आता तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे.
कपिल त्याच्या ‘ज्विगातो’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील कपिलचा लूक खूप आधी समोर आला होता, ज्यामध्ये तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसला होता. त्याचबरोबर आता या चित्रपटाचा शानदार ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कपिलची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे. लोकांना नेहमी हसवणारा विनोदी अभिनेता या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो जीवनातील संकटांना तोंड देत आहे. या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर १ मिनिट ३९ सेकंदाचा आहे, ट्रेलरची सुरवात एका बिल्डिंगपासून होते. जिथे कपिल हा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन येतो. पण अगदी सुरुवातीलाच एक सीन आहे, ज्यामध्ये डिलिव्हरी बॉयला इमारतीतील लिफ्ट वापरण्यास मनाई आहे आणि त्यामुळे तो जिने वापरून वर जातो असे दाखवण्यात आले आहे. डिलिव्हरी बॉयच्या समस्या या सीनमधून सांगण्यात आल्या आहेत.
कपिल शर्माने त्याच्या चित्रपटाचा हा ट्रेलर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने सांगितले की या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. तसेच टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये यशस्वी वर्ल्ड प्रीमिअरनंतर, आता झ्विगाटो आता बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज आहे.