महाराष्ट्रात हास्याला मिळणार हमखास आरक्षण, कारण  महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ येत आहे एका नव्या ढंगामध्ये, नव्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांना हसवण्यासाठी त्यांची अतरंगी, खुशखुशीत विनोदशैली घेऊन. यावेळी कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. मराठीतील बेधडक, बिनधास्त असे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे आणि महाराष्ट्राची लाडकी, देखणी आणि आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या कार्यक्रमातील कलाकारांचे परिक्षण करणार आहेत. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी आता तब्बल दीड तास बघायला मिळणार आहे म्हणजे कॉमेडीची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९.०० ते १०.३० या वेळेत बघायला मिळणार आहे.
कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना त्यांचे आवडते विनोदवीर आणि त्यांचे धम्माल विनोद बघायला मिळणार आहे एका नव्या अंदाजमध्ये. यावेळेस विनोदवीरांचे दोन गट करण्यात आले आहेत टिम – सुसाट आणि टिम – बुंगाट. टिम – सुसाट मध्ये तीन जोड्या असणार आहेत त्या म्हणजे अंशुमन विचारे – विशाखा सुभेदार, योगेश शिरसाट – नम्रता आवटे, श्याम राजपूत, पूजा नायक आणि प्रभाकर मोरे. तर टिम – भुंगाट मध्ये समीर चौगुले – भक्ती रत्नपारखी, संदीप गायकवाड – प्रसाद, अरुण कदम, अनुपमा ताकमोघे आणि पंढरीनाथ कांबळे या जोड्या असणार आहेत. प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ तयार आहे. यात प्रेक्षकांना जबरदस्त स्कीट बघायला मिळणार आहेत. स्कीटचे परीक्षण महेश कोठारे आपल्या खास शैलीमध्ये म्हणजेच धडाकेबाज, दे दनादन, धुमधडाका, असे करणार आहेत.
सोनाली कुलकर्णी कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमाचे परिक्षण करण्यास खूप उत्सुक आहे यावर बोलताना ती म्हणाली, “कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातील सगळ्या कलाकारांची स्कीट मला प्रेक्षक म्हणून बघायला खूप आवडतात. कारण या कार्यक्रमामध्ये मी बऱ्याचदा प्रमोशनसाठी आले आहे. त्यामुळे मी हा कार्यक्रम करण्यास खूप उत्सुक आहे. मी या कार्यक्रमामध्ये फक्त  परिक्षण करणार नसून मला काय बघायला आवडेल हे त्यांना सांगणार आहे. मी या कलाकारांचे स्कीट अधिक जवळून बघण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचा भाग बनले आहे फक्त परीक्षण करण्यासाठी नाही”.
कॉमेडीची बुलेट ट्रेन हा कार्यक्रम गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ९.०० ते १०.३० वा. कलर्स मराठीवर पाहता येईल.