अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरणाऱ्या कंगनानं काही काळापूर्वी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल खळबळजनक विधान केलं होतं. ‘भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं.’ असं वक्तव्य तिनं केलं होतं. ज्यावरून तिच्यावर बरीच टीका झाली होती.

कंगनाच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळातही बराच गोंधळ पाहायला मिळाला होता. याशिवाय कंगनावर देशभरातून टीका करण्यात आली होती. एवढंच नव्हे तर तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कारही परत घेण्याची मागणीही झाली होती. देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. आता याच प्रकरणी कंगनाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. २८ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेस जनरल सेक्रेटरी भरत सिंह यांनी कंगनाच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

कंगनाच्या विरोधात ही तक्रार विले पार्ले पोलीस ठाण्यात वकील आशिष राय आणि अंकित उपाध्याय यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे. यात म्हटलं आहे की, ‘कंगनाचं हे वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीद्वारे जगभरात पोहोचलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळे देशाचे नागरिक, स्वतंत्र लढ्यात आपले प्राण गमावणारे सैनिक आणि नेते यांच्या सन्मानाला ठेच पोहोचली आहे. तिचं हे विधान देशाच्या विरोधात आहे तसेच देशात दंगली आणि दहशतवाद भडकवणारं आहे.’

दरम्यान कंगना रणौत सध्या ‘टीकू वेड्स शेरू’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट तिच्या मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. या चित्रपाटत नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या मुख्य भूमिका आहेत. कंगनानं नुकतेच या शूटिंगचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यात ती डायरेक्टरच्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे. याशिवाय आगामी काळात कंगना ‘धाकड’, ‘तेजस’ आणि ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.