Coolie First Review : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे अनेकांचे आवडते अभिनेते आहेत. चित्रपटातील त्यांचा अभिनय, त्यांचं व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आता लवकरच त्यांचा ‘कुली’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ते मुख्य भूमिकेत आहेत.

लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघा काही वेळ असताना अभिनेते व राजकारणी उदयनिधी स्टॅलिन यांनी हा चित्रपट पाहिला असून त्यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘कुली’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देणारे ते पहिलेच आहेत.

उदयनिधी स्टॅलिन यांनी एक्सवर याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी यावेळी रजनीकांत यांचं कौतुक करत इंडस्ट्रीत त्यांना ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी पोस्टमधून त्यांनी म्हटलं की, “आपल्या सुपरस्टार रजनीकांत सरांना इंडस्ट्रीत ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा देताना मला आनंद होत आहे.”

‘कुली’ चित्रपटाबद्दल उदयनिधी स्टॅलिन काय म्हणाले?

‘कुली’ चित्रपटाबद्दल पुढे उदयनिधी म्हणाले, “कुली’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकर पाहण्याची संधी मिळाली. हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. मला हा चित्रपट पाहताना खूप मज्जा आली. हा अनेकांची पसंती मिळवणार असून मला खात्री आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार आहे.”

उद्यनिधी यांनी यानंतर आमिर खान, नागार्जून, अनिरुद्ध रवीचंद्र, उपेंद्र, श्रुती हासन आणि चित्रपटातील संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ‘कुली’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. यामध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट गुरुवार १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून त्याचवेळी ह्रतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांचा ‘वॉर २’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत.