करोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसंच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली आहे.

अक्षय कुमारने ट्विट करत सांगितलं आहे की, “आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी जे काही गरजेचं आहे ते सगळं केलं पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू…”.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत पंतप्रधान केअर फंडसाठी आपण छोट्यात छोटी रक्कमही दान म्हणून स्वीकारत असल्याचं सांगत मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. आपल्या पुढील भविष्यातील पिढ्यांसाठी भारताला निरोगी आणि समृद्ध बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुयात असंही त्यांनी म्हटलं होतं.

फक्त अक्षय कुमारच नाही तर अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपती मदतीसाठी पुढे येत आहेत. मदतीसाठी हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनीदेखील पुढाकार घेतला आहे. . हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शर्माने पंतप्रधान मदत निधीमध्ये ५० लाख रुपयांची रक्कम दान केल्याची माहिती दिली आहे.

करोना रुग्णांच्या उपचारासाठी अभिनेता प्रभासने तब्बल ४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे. प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत. दरम्यान, प्रभासप्रमाणेच दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. पवन कल्याण, रामचरण,चिरंजीवी, महेश बाबू या कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. पवन कल्याण यांनी २ कोटी रुपये मदतनिधी म्हणून दिले असून महेश बाबूने १ कोटी रुपयांची मदत केली आहे.