‘गहराइयां’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा होती. अर्थात ती या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांमुळे हे काही वेगळं सांगायला नको. पण चित्रपट पाहताना त्याचे वेगवेगळे पैलू समोर येतात. ही कथा आहे अलिशाची (दीपिका पदुकोण). अलिशा एक योग प्रशिक्षक आहे आणि बॉयफ्रेंड करण (धैर्य कारवा) सोबत ६ वर्षं लिव्ह- इनमध्ये राहत असते. पण पुढे ती टिया (अनन्या पांडे) म्हणजेच तिच्या चुलत बहीणीचा बॉयफ्रेंड, झेनच्या (सिद्धांत चतुर्वेदी) प्रेमात पडते. दोघं एकमेकांमध्ये गुंतत जातात. ज्याबद्दल टियाला कल्पनाही नसते. दरम्यान तिचं करणशी ब्रेकअप होतं. पण अलिशा-टिया-झेन यांच्या नात्यातील गुंता मात्र वाढत जातो. बऱ्याच अनपेक्षित गोष्टी एका मागोमाग एक घडत जातात. अलिशाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तिच्या आयुष्यातलं एक गुपित तिला समजतं ज्यामुळे ती अनेक वर्षं मानसिक तणावातून जात असते. अलिशाच्या आयुष्यात काय घडतं? काय असतं ते गुपित? पुढे टिया आणि अलिशाच्या नात्याचं काय होतं? या सर्व गोष्टींच्या भोवती ‘गहराइयां’चं कथानक फिरत राहतं.

आतापर्यंत बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातून होणारी नात्यांची गुंतागुंत दाखवली गेली आहे. अनेकदा चित्रपटांमध्ये एकसुरीपणा आला. पण ‘गहराइयां’मध्ये मात्र हाच विषय थोड्या हटके पद्धतीनं हाताळण्यात आला आहे. नात्यांमध्ये अविश्वास आणि दुरावा का निर्माण होतो? याचं खोल चित्रण दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी त्यांच्या चित्रपटात मांडलंय. त्या दृष्टीनं ‘गहराइयां’ हे नाव चित्रपटाला समर्पक ठरतं. चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे दीपिका पदुकोणचा दमदार अभिनय. दीपिकानं तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय आणि यात तिला सिद्धांत चतुर्वेदीची उत्तम साथ मिळाली आहे. चित्रपटातील संवाद दमदार नसले तरी प्रसंगी दीपिकाचे डोळे बरंच काही बोलताना दिसतात.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

दीपिकानं साकारलेली अलिशाची व्यक्तीरेखा चित्रपटात अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दिसते. चित्रपटात केवळ प्रेम आणि नात्यांची गुंतागुंतच दाखवण्यात आलेली नाही तर मानसिक तणाव, नैराश्य या गोष्टींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. खऱ्या आयुष्यातही नैराश्याचा सामना करणाऱ्या दीपिकानं अलिशाच्या आयुष्यातील नैराश्याचा काळ मोठ्या पडद्यावर उत्तम साकारला आहे. भूतकाळातील काही गोष्टी वर्तमानात त्रास देत असतानाही अलिशा तिच्या आयुष्यात पुढे जात राहते. कठोर निर्णय घेते आणि अपयशातूनही खंबीरपणे उभी राहताना दिसते. मात्र हा विषय आणखी उत्तम पद्धतीनं हातळता आला असता असं चित्रपट पाहताना सतत वाटत राहतं.

झेनच्या भूमिकेत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं कमाल अभिनय केला आहे. एकीकडे गर्लफ्रेंड टिया, दुसरीकडे अलिशाबद्दल वाटणारं प्रेम आणि बिझनेसमध्ये अचानक आलेल्या समस्या यात गुरफटत गेलेला, त्रासलेला असतानाही स्वतःवर संयम ठेवणारा झेन सिद्धांतनं चांगल्या पद्धतीनं साकारला आहे. त्यानं त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. वरवर साधी सरळ वाटणारी चित्रपटाची कथा गुंतागुंतीची आहे हे हळूहळू समजतं. मात्र चित्रपटाचा वेग हा त्यात दाखवलेल्या समुद्राच्या लाटांसारखा कधी कमी, कधी जास्त तर कधी स्थीर वाटतो. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली मादक किंवा रोमँटीक दृश्यांची जी चर्चा झाली ती सर्वच दृश्यं कथेची गरज आहे याचा प्रत्यय चित्रपट पाहताना येतो.

संपूर्ण चित्रपट दीपिकाच्या खांद्यावर आहे हे काही वेगळं सांगायला नको. तिचा अभिनय सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत तुम्हाला स्क्रिनवर शेवटपर्यंत टिकून राहण्यास भाग पाडतो. असं असतानाही नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्या लहानशा भूमिकाही प्रेक्षकांची मनं जिंकतात. पण अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्या वाट्याला मात्र चित्रपट फारसा आलेला नाही हे दिसतं. त्याच्या भूमिका ठीकठाक वाटतात. अनन्याचा अभिनय जेमतेम आहे असं म्हटलं तरीही वागवं ठरणार नाही. चित्रपटाची कथा व्यवस्थित पुढे जात असताना क्लायमॅक्समध्ये आलेला ट्वीस्ट मात्र प्रेक्षकांची निराशा करतो. चित्रपटाचा शेवट अनपेक्षित आहे. तो बराचसा अर्धवट सोडल्यासारखा वाटतो. एकंदर, कथा, संगीत, संवाद सर्व ठीकठाक वाटतं. चित्रपटातील काही दृश्यं खरंच हृदयस्पर्शी आहेत. प्रेमाचा त्रिकोण, नात्यांची गुंतागुंत हे सर्व जरी नवीन नसलं तरीही दीपिकाचा अभिनय आणि काही हटके पाहायचं असेल तर ‘गहराइयां’ चांगला पर्याय ठरतो. ‘गहराइयां’साठी लोकसत्ता ऑनलाइनकडून तीन स्टार.

-मेघा जेठे