बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तो वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे. यादरम्यान आमिर खान त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंबद्दल बोलत आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले की, अभिनेत्री साधना यांच्या साखरपुड्याच्या पार्टीत त्याचे काका नासिर हुसेन आणि देव आनंद यांच्यात भांडण झाले होते.

मॅशेबल इंडियाला दिलेल्या एका खास मुलाखतीत आमिर खानने सांगितले की, अभिनेत्री साधना यांच्या साखरपुड्याची पार्टी पाली हिल्समधील एका बंगल्यात सुरू होती. त्या पार्टीत आमिर खानचे काका नासिर हुसेन आणि अभिनेता देव आनंददेखील उपस्थित होते. देव आनंद यांनी बोललेल्या एका गोष्टीबद्दल नासिर हुसेन यांना वाईट वाटले, त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. आमिर खानने सांगितले की, दोघेही दारूच्या नशेत होते.

भांडणाचे कारण काय होते?

आमिर खानने सांगितले की, त्याचे काका देव आनंद यांचे धाकटे भाऊ विजय आनंद (गोल्डी) यांच्या खूप जवळचे होते. आमिर म्हणाला की, नासिर हुसेन हे देव आनंद यांचे खूप चांगले मित्र होते. आमिर म्हणाला, “त्या वेळी ‘तीसरी मंजिल’ हा चित्रपट बनवण्यात येणार होता. शम्मी कपूर या चित्रपटात होते, पण सुरुवातीला हा चित्रपट देव आनंद यांच्याबरोबर बनवण्यात येणार होता. देव साहेब अभिनय करणार होते आणि नासिर साहेब या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. याबरोबरच ते (नासिर हुसेन) एका चित्रपटाची निर्मिती करत होते, ज्याचे दिग्दर्शन गोल्डी अंकल करत होते. त्याचे नाव होते ‘बहारों के सपने’, राजेश खन्ना त्यात होते.”

दोघांनी दारू प्यायली होती : आमिर खान

आमिर खान म्हणाला की, ‘बहारों के सपने’ हा एक सामाजिक चित्रपट होता, ज्याची कथादेखील नासिर हुसेन यांनी लिहिली होती; तर ‘तीसरी मंजिल’ हा एक मजेदार-रोमँटिक चित्रपट होता. आमिर म्हणाला की, ‘तीसरी मंजिल’ हा एक रंगीत चित्रपट होता आणि ‘बहारों के सपने’ हा ब्लॅक अँड व्हाईट होता. आमिर खानने सांगितले की, पार्टीत नासिर हुसेन यांनी देव आनंद यांना असे म्हणताना ऐकले की, ‘नासिर माझ्याबरोबर एक मोठा रंगीत चित्रपट बनवत आहे आणि माझ्या भावाला छोटा चित्रपट दिला आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, कोणी न्यू कमर आहे राजेश म्हणून.” आमिर खान सांगतो की, त्याच्या काकांना हा मोठा चित्रपट आणि छोटा चित्रपट आवडला नाही. या विषयावर दोघांमध्ये वाद सुरू झाला, त्यानंतर त्यांच्यात भांडण झाले.

आमिर खानने सांगितले की, त्याने अभिनेत्री साधना यांच्याबरोबर झालेल्या या घटनेची पुष्टी केली होती. साधना यांनी आमिर खानला सांगितले होते की हे भांडण त्यांच्या पार्टीत झाले होते. साधना यांनी आमिरला सांगितले होते की दोघेही दारू पिऊन भांडत होते.