‘है अपना दिल तो आवारा…’ असं म्हणतं आपल्या अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर येणारे आणि लाखों तरुणींना घायाळ करणारे देव आनंद आजही अनेक तरुणींच्या मनाचा ठाव घेतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये देव आनंद यांचं नाव आवर्जुन घेण्यात येतं. त्यांच्या सहाबहार अभिनयापासून ते अगदी आपल्या अनोख्या अंदाजात अभिनेत्रीला भुलवण्याच्या युक्त्यांपर्यंत आजही सर्व काही चर्चेचा विषय ठरतं.

बऱ्याच चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या देव आनंद यांच्या संवाद कौशल्याचेही अनेक चाहते आहेत. पण, या अभिनेत्याच्या ‘फिमेल फॅन फॉलोइंग’ प्रचंड मोठा होता. विशेष म्हणजे या अभिनेत्याबद्दलची अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. देव आनंद यांना अडचणीत टाकणारी ती गोष्ट म्हणजे काळा कोट किंवा काळ्या रंगाचे कपडे.

पांढऱ्या रंगाच्या शर्टवर काळ्या रंगाचा कोट घातलेल्या या अभिनेत्यावर त्या काळात अनेक तरुणी घायाळ झाल्या होत्या.  त्यांचा हा अंदाज त्या काळात खऱ्या अर्थाने चर्चेत होता. कारण तरुणी अक्षरश: देव आनंद यांच्यासाठी वेड्या होत्या. ‘काला बाजार’ या चित्रपटानंतर देव आनंद यांचा काळ्या कोटमधील लूक प्रचंड चर्चेत आला होता. मुख्य म्हणजे देव साहेबांना या लूकमध्ये पाहून मुली अक्षरश: वेड लागल्याप्रमाणे वागायच्या. इतकंच नव्हे तर आपल्या आवडत्या अभिनेत्यापोटी त्या कोणतंही संकट ओढवून घेण्यासाठी, इमारतीवरुन उडी मारण्यासाठीही तयार असायच्या. सरतेशेवटी हाताबाहेर जाणारी ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि कोणाच्याही जीवाला धोका पोहोचू न देण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.