ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘आदिपुरुष’मध्ये मराठी अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. टीझरमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली. देवदत्तचा अभिनय आणि फिटनेस याचे लोक चाहते आहेत. ‘जय मल्हार’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. मराठी टेलिव्हिजनमुळेच देवदत्त घराघरात पोहोचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवदत्तने नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट आणि चित्रपटासंदर्भात भाष्य केलं आहे. ओम राऊतच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात तो झळकला शिवाय आता ‘आदिपुरुष’ या चित्रपटातही तो महत्त्वाची भूमिका साकारत आहे. त्याने मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीकडे कधीही पाठ फिरवणार नाही असं वक्तव्य केलं आहे. शिवाय जय मल्हार या मालिकेने त्याला दिलेली ओळख आणि लोकप्रियता याबद्दलही त्याने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : अभिनेत्री एरिका फर्नांडिसने घेतला भारत सोडायचा निर्णय; व्हिडिओच्या माध्यमातून कारण आलं समोर

‘इ टाइम्स’शी संवाद साधताना तो म्हणाला, “मी माझ्या आयुष्यात बंधनं घालून ठेवलेली नाहीत.टेलिव्हिजनने मला बरंच काही दिलं. त्यामुळेच मी आयुष्यात ‘जय मल्हार’सारखी सुपरहीट मालिका करू शकलो. लोक अजूनही त्यातील माझ्या भूमिकेची आठवण काढतात. यापुढे माझ्या आयुष्यात कितीही मोठे प्रोजेक्ट आले तरी मला टेलिव्हिजनने जे दिलं आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. जरी मी बॉलिवूडमध्ये गेलो तरी टेलिव्हिजनमुळे आज मला जी लोकप्रियता मिळाली आहे त्याप्रती मी कायम कृतज्ञ राहीन.”

‘आदिपुरुष’मध्ये हनुमानची भूमिका साकारणारा देवदत्त नागे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. त्याने बऱ्याच मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्याने काही मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे. त्याने ‘जय मल्हार’ मालिकेत साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. याबरोबरच ‘देवयानी’, ‘वीर शिवाजी’ या मालिकांमधील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devdatta nage speaks about marathi television industry and bollywood avn
First published on: 29-12-2022 at 16:53 IST