प्रेमात पडणाऱ्यांसाठी आणि प्रेमात पडलेल्यांसाठी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट अत्यंत खास आहे. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांच्यातील केमिस्ट्री प्रत्येक प्रेक्षकाला आणि तरुणाईला भावली, त्यामुळे हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. या चित्रपटातील प्रत्येक संवाद, सीन हे अत्यंत सुंदररित्या सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही सीन प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरले. आज या लोकप्रिय चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्ष झाले. मात्र, या चित्रपटाची क्रेझ, भूरळ आजही प्रेक्षकांमध्ये असल्याचं पाहायला मिळतं.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील एक गाजलेला सीन म्हणजे रेल्वे स्टेशनवरील शाहरुख आणि काजोलचा ‘पलट सीन’. मात्र या सीन मागची खरं कथा फार कमी जणांना माहित आहे. हा सीन एका हॉलिवूडपटातून कॉपी केल्याचं सांगण्यात येत आहे.

‘रिपब्लिक वर्ल्ड’नुसार, १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात रोमॅण्टीक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर विविध विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटातील रेल्वे स्टेशनवरील काजोलचा पलट सीन तुफान गाजला होता. हा सीन आजही ‘आयकॉनिक सीन’ म्हणून ओळखला जातो. परंतु हा सीन एका हॉलिवूडपटातून कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोल आणि शाहरुखमधील हा सीन हॉलिवूडपट ‘इन द लाइन ऑफ फायर’ या चित्रपटातून कॉपी केल्याचं म्हटलं जातं आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील हा सीन चांगलाच व्हायरल होत आहे. या हॉलिवूडपटाचं दिग्दर्शन वोल्फगँग पीटरसन यांनी केलं होतं. या चित्रपटात क्लिंट इस्टवुड याने फ्रँक होरिगन ही भूमिका साकारली होती. तर हॉलिवूड अभिनेत्री रेनी रुसो,लिली रेन भूमिकेत झळकली होती.

दरम्यान,दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील हा सीन हॉलिवूडपटातून प्रेरणा घेऊन केल्याचं मान्य केलं होतं. मात्र सध्या या सीनची जोरदार चर्चा सुरु आहे.