“पार्टीसाठी सगळे एकत्र येतात मग आता…” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत दिग्दर्शकाने सेलिब्रिटींना सुनावलं

बदनाम करण्याचा हा नवा पॅटर्न असल्याचं हंसल मेहता त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

hansal-mehta-shilpa-shetty

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यापासूनच बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे समोर आल्याने शिल्पा आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राल मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. अशातच बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आता शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिला आहे. तसचं बॉलिवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनवर हंसल मेहता भडकले आहेत.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एक नव्हे तर तीन ट्वीट करत शिल्पा शेट्टीचं समर्थन केलंय. पहिल्या ट्वीटमध्ये हंसल मेहता म्हणाले, ” शिल्पा शेट्टीला पाठिंबा देऊ शकतं नाही तर किमान तिला एकटीला सोडा आणि न्यायालयाला निर्णय ठरवू द्या. या कठिण काळात तिला शांतीत राहू द्या. ही खूपच वाईट गोष्ट आहे की जे नावाजलेले लोक आहेत त्यांना न्याय मिळण्याआधीच दोषी ठरवलं जातं.” असं हंसल मेहता ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

तर दुसऱ्या एका ट्वीटमधुन त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधलाय. “हे मौन आता पॅटर्न बनलंय. चांगल्या काळात सर्वजण पार्टी करण्यासाठी एकत्र येतात आणि वेळ खराब असली की सगळे शांत राहतात आणि त्या व्यक्तीला एकटं टाकलं जातं. अखेरीस खंर काय आणि खोटं काय याने कुणालाही फरक पडतं नाही.”

बदनाम करण्याचा हा नवा पॅटर्न असल्याचं हंसल मेहता त्यांच्या पुढच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. “एखाद्या सिनेसृष्टीतील व्यक्तीवर आरोप असल्यास त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. आधीच मत तयार करणं, चारित्र्यावर निशाणा साधणं, गॉसिप करत बातम्या पसरवणं असे प्रकार होतात.” अशा आशयाचं ट्वीट करत हंसल मेहता यांनी खंत व्यक्त केली.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैला राज कुंद्रला अटक केली होती. राज कुंद्रावर अश्लील सिनेमाच्या रॅकेटमध्ये प्रमुख आरोपी असल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत होती. राज कुंद्राविरोध पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली. त्यानंतर राज कुंद्राच्या विविध बँक खात्यांवरदेखील कारवाई करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Director hansal mehata supports shilpa shetty after raj kundra arrest angry on bollywood celebrity silence kpw