मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात पोस्टमध्ये त्यांनी शाहीर साबळे यांच्या संदर्भात माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

केदार शिंदे यांची पोस्ट

“अरे संसार संसार, भानुमती साबळ्यांच्या घरची सून तर झाली,पण अचानक घरातून पळून आलेल्या, तीला मानसिक आधार देण्याइतकी परीपक्वता शाहीरांच्या घरातल्या महिलावर्गाकडे अजिबातच नव्हती…तीला आधार होता तो फक्त शाहीरांचा..शालेय शिक्षण अर्धवट सोडलेली भानुमती कोमेजलेल्या चेहर्याने घरात बसलेली पाहून शाहीर अस्वस्थ होत..आता पसरणीतुन बाहेर पडल्या शिवाय दुसरा पर्यायच त्यांच्या समोर नव्हता..शेवटी भानुमतीचं अर्धवट राहीलेल शिक्षण पूर्ण करण्याच कारण देत,शाहीरांनी आपण सातारला स्वतंत्र बिर्हाड थाटायचा निर्णय घेतोय हे घरात सांगुन टाकल..तो काळ असा होता की मुळात मुलींच्या शिक्षणाला किंमत निदान मराठा समाजात नव्हती. त्यात लग्न झालेल्या पोरीने चूल आणि मूल सोडून शिकण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडण तर अजीबात पचण्यासारख नव्हतच. शेवटी घरच्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत शाहीरांनी भानुमतीसह सातारला प्रयाण केलच..इथेच साबळे कुटूंबातल्या महिलांच्या मनात भानुमतीबद्दलची कटूता कायमची मनात रुजली..

सातारला एका वाड्याची वरची प्रशस्त माडी शाहीरांनी मित्रांच्या मदतीने भाड्याने घेतली होती..सातार्यात येताच भानुमतीने मोकळा श्वास घेतला…शेजारीच कर्मवीर भाऊराव पाटीलही रहात होते. त्यामुळे तीच्या पुढील शिक्षणासाठी शाहीरांनी भानुमतीला ” रयतच्या शाळेतच ” प्रवेश घेऊन दिला..आता भानुमतीच्या गुदमरलेल्या काव्यप्रतीभेला नवे धुमारे फुटू लागले..शाहीर तीच्यात लोकसंगीताची जाणीव भरत होते. आणि ती त्यांच रहाणीमान आणि भाषेची साफसफाई करण्याच्या मागे लागलेली होती .दोघेही आपल्यात सुधारणा करुन घ्यायला उत्सुक होते..

शाहीर पोटापाण्याच्याही मागे होतेच..स्वतंत्र संसार ही फार मोठी जबाबदारी होती..शाहीर तुरळक कार्यक्रम तर करत होतेच पण मुंबईत आपल बस्तान बसवण्याच्या प्रयत्नातही होते..आकाशवाणी आणि एच.एम.व्ही.त्यांना आकर्षीत करत होते..ते सतत मुंबई सातारा ये जा करत असत..शालेय शिक्षण घेतानाच भानुमती पहिल्यांदा गरोदर राहीली..आता ही दुहेरी जबाबदारी येऊन पडली होती शाहीरांवर.पण त्याचवेळी त्यांना मुंबईतील एच.एम.व्ही.कडून गाणी रेकॉर्ड करण्याच पहील contract मिळालं..भानुमतीला अशा अवस्थेत मुंबईत फारकाळ रहाणं शाहीरांना रुचेना, पण भानुमतीनेच त्यांना धीर दिला आणि मुंबईला जायला प्रोत्साहन दिलं..

मुंबईत शाहीरांच व्यवसायीक खात खोललं गेल..त्यांचं पहीलं लोकगीत रेकॉर्ड झालं…सातार्यातल बस्तान बसवतानाच शाहीरांना धाप लागलेली,त्यामुळे मुंबईत जम बसवणं सध्या तरी अशक्यच होत..ते अप डाऊन करत दिवस ढकलत होते..भानुमतीचेही गर्भारपणाचे दिवस भरले आणि तीने पहील्या मुलाला देवदत्तला जन्म दिला…

मुलाला सांभाळतच भानुमतीने आपल शिक्षण पुर्ण केल..याच काळात तीने भाऊराव पाटलांच्या जीवनावर आधारीत पोवाडाही लिहीला आणि तो शाहीरांनी भाऊरावांच्या समक्ष गाऊनही दाखवला..भाऊरावांना स्वत:चं खडतर आयुष्य ऐकून रडू आवरण अशक्य झाल होतं..” शाहीरा तुम्ही मला रडवलत ” हे भाऊरावांच वाक्य होत..सातार्यात असतानाच भानुमतीने यशोधराला जन्म दिला…संसार आता बहराला आला होता..शाहीरांच सगळच रहाणीमान भानुमतीने बदलल होतच. त्यात आता कौटूंबीक रहाणीमानही पुढारलेल होऊ लागल होत..मुंबईतील काम वाढल्यामुळे आता मुंबईला प्रस्थान करायची वेळ आली होती…आणि सातार्यातल दाणापाणी संपवून शाहीर सहकुटूंब मुंबईकडे प्रस्थान करते झाले….”, असे केदार शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.