कुठल्यातरी एका प्रांताची संस्कृती, तिथली सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती, तिथली भाषा या सगळ्याचा अचूक उपयोग करत सगळ्यांनाच आपलासा वाटेल अशा विषयावर चित्रपट माध्यमातून भाष्य करायचं ही सोपी गोष्ट नाही. गावातल्या तरुणांची लग्नं न होणं हा सध्या राज्यभरातला महत्वाचा विषय. गावात वाढलेल्या तरुणींनाही शहरात नोकरीधंदा असलेला जोडीदार हवा आहे. गावात कामच नाही, मग इथे राहून काय करणार? हा प्रश्न गावातल्या तरुणांनाही सतावतो. वर आणि वधू दोन्ही पक्षांना सतावणाऱ्या या प्रश्नाचा धागा कोकणच्या मातीशी जोडत एक रंजक, धमाल अनुभव देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विजय कलमकर यांनी ‘कुर्ला टु वेंगुर्ला’ या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.

मुंबईतली नोकरी गेली म्हणून कोकणात परतलेला आनंद आणि शहरात शिकून नोकरीसाठी मुंबईत न जाता गावातच व्यवसाय करायचा या निर्धाराने गावी परतलेला परिमल या दोन तरुणांची गोष्ट ‘कुर्ला टु वेंगुर्ला’ चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आनंदचं मन मुंबईत रमत नाही, मात्र तो मुंबईत कामाला आहे या एका गोष्टीवर गौरीने त्याच्याशी लग्न केलं आहे. गौरीला आनंदबरोबर मुंबईत संसार थाटायचा आहे. दुसरीकडे इतकं शिकून मुंबईत जाऊन नोकरी करण्यापेक्षा परिमलने गावातच राहायचं निर्धार केला म्हणून त्याच्या घरचे त्याच्यावर नाराज आहेत. परिमलला लगेच लग्न करायची इच्छा नाही, पण गावातल्या तरुणांनी त्यांची परिस्थिती स्वत:च बदलायला हवी असं त्याला वाटतं. त्यासाठी आणि स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी परिमल आनंदलाही बरोबर घेतो. या सगळ्या खटाटोपात मुंबईतली नोकरी सुटली हे आनंदने गौरीपासून लपवलेलं सत्य बाहेर येतं आणि त्यांच्या प्रेमात मीठाचा खडा पडतो. परिमलचा गावात व्यवसाय उभारण्याचा हट्ट आणि आनंद-गौरीचा मोडलेला संसार या दोन्हींच्या माध्यमातून नेमके प्रश्न मांडण्याचा प्रयत्न लेखक अमरजीत आमले यांनी केला आहे.

गावात आर्थिक विकासाच्या संधी नाहीत, त्यामुळे तिथल्या तरुणाशी लग्न केलं तर तथाकथित सुखसोयी मिळणार नाहीत, ही तरुणींची मानसिकता आणि शहरातल्या चकचकीत सोयीसुविधा नाही देऊ शकलो तरी गावात घरच्यांबरोबर आनंदाने जगता येतं आहे ही तरुणांची भूमिका दोन्ही बाजूंमध्ये चूक कोणाचीच नाही. मात्र, ही कोंडी आपसूक फुटणार नाही, त्यासाठी दोघांनीही आपापले दृष्टिकोन बदलायला हवेत आणि आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने ठोस प्रयत्न करायला हवेत, हे साध्या-सोप्या पध्दतीने मांडलेला कथाप्रपंच दिग्दर्शक विजय कलमकर यांनीही तितक्याच सहज शैलीत पडद्यावर रंगवला आहे. याही चित्रपटात नाही म्हटलं तरी दोन समांतर कथा आहेत, पण पूर्वार्धात सुरुवातीला चित्रपट परिमलच्या गोष्टीभोवती अधिक फिरतो आणि मग नंतर तो आनंद-गौरीच्या गोष्टीत अधिक गुंतून पडतो. परिमलने घेतलेली भूमिका योग्य असली तरी वास्तवात गावात रोजगार उभा करताना येणाऱ्या विविध अडचणी, मुद्यांना लेखक – दिग्दर्शकाने हात घातलेला नाही. त्यामुळे किमान परिमलची गोष्ट अगदीच सुकर केली आहे, पण ती तितक्या सहजपणे वास्तवात उतरणारी नाही हा विचार मनात डोकावल्याशिवाय राहात नाही. त्या तुलनेत आनंद आणि गौरीची गोष्ट मात्र त्या दोघांचे स्वभाव, एकमेकांबरोबरचा संवाद, वाद आणि त्यानंतर एकमेकांना समजून घेत पुढे जाण्यासाठी केलेले प्रयत्न, यातून हळूहळू उलगडत गेलेले दोघांच्याही मनाचे गुंते हा भाग अधिक ठळकपणे मांडला आहे.

‘कुर्ला टु वेंगुर्ला’ चित्रपट करताना उगाचच कोकणातील सौंदर्यच दाखवायचं म्हणून कॅमेरा फार निसर्गातली प्रत्येक गोष्ट टिपत राहात नाही. गावचा निसर्ग, तिथली माणसं, त्यांची मालवणी भाषा, देहबोली, त्यांचा आहारविहार या सगळ्या गोष्टी हातात हात घालून समोर येतात. चित्रपटात कलाकारांची निवड करताना नामांकित कलाकार आणि कोकणातील स्थानिक कलाकार यांची सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही ओढूनताणून कोणी संवाद म्हणतो आहे, कोणी आक्रस्ताळा अभिनय करतो आहे अशा खटकणाऱ्या गोष्टी चित्रपटात नाहीत. साईंकित कामत, प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर या अनुभवी कलाकारांबरोबरच अनघा राणे आणि अमेय परब या दोन नवोदित कलाकारांनीही उत्तम काम केले आहे. गौरी आणि अनघा या दोन्ही व्यक्तिरेखा सशक्त महिला असल्याचा अभिनिवेश आणत नाहीत, आदर्श विचार-मूल्यं यांचा सतत उच्चार करत नाहीत. दोघीही गावातच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. दोघींचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत, पण खऱ्या अर्थाने या दोन्ही व्यक्तिरेखा इतर सगळ्या व्यक्तिरेखांपेक्षा अधिक टोकदारपणे उतरल्या आहेत. वैभव मांगले यांनी साकारलेला तांबट आणि सुनील तावडे यांनी साकारलेली आनंदच्या वडिलांची भूमिका दोन्ही भूमिकांनी चित्रपटात रंगत आणली आहे.

चित्रपटाच्या शीर्षकातली दोन्ही शहर आणि गावाचे नाव हे प्रतिकात्मक असले तरी कथेच्या दृष्टीने मांडणी करताना दोन्ही शहरांचा तसा मर्यादित पध्दतीने विचार झालेला दिसतो. वेंगुर्ला हेही ब्रिटिशकाळापासून शहरच आहे आणि तिथले वातावरणही शहराच्या जवळ जाणारे अधिक आहे. ते अगदीच छोटेखानी गाव नाही. त्याचे प्रतिबिंब कुठेतरी चित्रपटात दिसायला हवे. तोच भाग कुर्ल्याच्या बाबतीत. कोकणी माणूस फक्त चाळीतच अडकून पडला आहे, असंही नाही. अर्थात, त्यामुळे कथेवर फार परिणाम होत नाही हेही तितकंच खरं. पहिल्यांदाच कथेच्या अनुषंगाने केलेली उत्तम पात्रनिवड, कथामांडणी, मालवणी भाषेतले संवाद आणि सहज अभिनय यामुळे ‘कुर्ला टु वेंगुर्ला’ हा उत्तम रंजक अनुभव ठरला आहे.

कुर्ला टु वेंगुर्ला

दिग्दर्शक – विजय कलमकर

कलाकार – साईंकित कामत, प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, अनघा राणे, अमेय परब.