scorecardresearch

मायानगरीतील स्वप्नांच्या प्रवासाची गोष्ट ‘डबल सीट’

मुंबईत जणू स्वप्नांची एक स्पर्धाच चाललेली असते. ही स्पर्धा असते या शहरात आपली ओळख निर्माण करण्याची

मुंबईत जणू स्वप्नांची एक स्पर्धाच चाललेली असते. ही स्पर्धा असते या शहरात आपली ओळख निर्माण करण्याची, या शहरात नाव कमावण्याची आणि या स्पर्धेत आपल्या स्वप्नाचं अस्तित्व कसं टिकून राहील याची. हा प्रवास कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. या शहरातील अशाच एका स्वप्नाची आणि एका अनोख्या प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार ‘डबल सीट’ या आगामी मराठी चित्रपटातून. अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय समीर विद्वांस या आजच्या पिढीच्या तरूण दिग्दर्शकाने. ‘डबल सीट’ हा नवा चित्रपट येत्या १४ ऑगस्टला प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा शानदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटाच्या टीमसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
double-seat-mukta-ankush
‘डबल सीट’ या चित्रपटाची कथा आहे मुंबई शहराची आणि या शहरात राहणा-या अमित आणि मंजिरी या मध्यमवर्गीय नवदाम्प्त्याच्या स्वप्नांची. अमित एका कुरिअर कंपनीत नोकरीला आहे तर मंजिरी लाईफ इन्शुरन्स एजंट. मुंबईतील अनेक कुटुंबाप्रमाणे लालबाग-परळ भागातील एका जुन्या चाळीत एकत्र कुटुंबात राहणारं हे जोडपं. मुंबईच्या गर्दीत रोजच्या धकाधकीच्या जीवनात जगण्याची एक विचित्र शर्यत सुरू असते. या शर्यतीत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अमित आणि मंजिरीही सहभागी आहेत. अमित आणि मंजिरीचं एक स्वप्न आहे, स्वतःच्या घराचं. कोणताही लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्यासाठी प्रवास करण्याची तयारी असणंही तेवढंच गरजेचं. अशाच एका प्रवासासाठी अमित आणि मंजिरी निघाले आहेत. हा प्रवास आहे त्यांच्या स्वप्नांचा. या प्रवासात काय अडचणी येतात? कोणती संकटे येतात? त्यावर ते मात करतात की माघार घेतात ? या प्रवासात ते एकटे पडतात की त्यांना सहप्रवासीही मिळतात? याचीच कथा म्हणजे ‘डबल सीट’ हा चित्रपट.
double-seat-music-launch
या चित्रपटात अमितची भूमिका साकारलीये अंकुश चौधरीने तर मंजिरीच्या भूमिकेत आहे मुक्ता बर्वे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. याशिवाय चित्रपटात विद्याधर जोशी, वंदना गुप्ते, शुभंकर तावडे, संदीप पाठक, आसावरी जोशी आणि पुष्कर श्रोत्री हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. स्वप्नांची नगरी असलेल्या या मुंबापुरीची आणि यातील एका सर्वसामान्य जोडप्याची, त्यांच्या कुटुंबाची कथा आणि त्यांच्या स्वप्नांचा ‘डबल सीट’ प्रवास येत्या १४ ऑगस्टपासून एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Double seat movie music launch

ताज्या बातम्या