रंगभूमी गाजवलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम आता चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले असून कलाकारांची मोठी फौज असलेला ‘धामधूम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. ‘इच्छापूर्ती’ प्रॉडक्शन निर्मित आणि ‘अनामय’ प्रॉडक्शन प्रस्तुत ‘धामधूम’ या चित्रपटाद्वारे निर्माते रविंद्र वायकर हेही पहिल्यांदाच चित्रपटनिर्मितीत उतरत आहेत. ‘मधु’ या एको नावामुळे चार कुटुंबात होणाऱ्या गडबडगोंधळाची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाचा नायक एका मुलीवर प्रेम करतो आहे. त्याच्या आईने त्याच्यासाठी दुसरी मुलगी पसंत केली आहे तर त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी तिसरीच मुलगी पसंत केली आहे. या तीन मुलींमध्ये तो नेमका कोणाचा स्वीकार करणार? गैरसमजांच्या मालिके तून नेमका मार्ग कसा काढणार?, याचे उत्तर शोधणारा हा निखळ मनोरंजक असा चित्रपट आहे. या चित्रपटात भरज जाधव, सिध्दार्थ जाधव, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, सयाजी शिंदे, केतकी दवे, आनंद अभ्यंकर, मुग्धा शहा, विनय आपटे, किशोर प्रधान, अश्विनी आपटे, विजू खोटे अशा नव्या जुन्या मराठी कलाकारांचा ताफा दिसणार आहे. या एवढय़ा कलाकारांची आणि दिग्दर्शक देवेंद्र पेम यांची पडद्यावरची ही निखळ ‘धामधूम’ ११ ऑक्टोबरला सर्व चित्रपटगृहांमधून पाहता येणार आहे.