गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहे. त्यातच आता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला तिसरा समन्स जारी करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पूजाला काही दिवसांपूर्वी दुसरे समन्स बजावण्यात आले होते. मात्र तिने तपास यंत्रणेकडे काही वेळ मागितला होता. दरम्यान मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई क्रूझ ड्रग्जप्रकरणी आतापर्यंत २० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे मुंबई क्रूझ ड्रग्सप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभाग अधिकाऱ्यांविरोधात एसआयटी चौकशी केली जात आहे. त्या अधिकाऱ्यांविरोधात खंडणीच्या आरोपांची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र तब्येत खराब असल्याचे कारण देत तिने एनसीबी चौकशीला येण्यास नकार दिला. तसेच मला थोडा वेळ हवाय, असेही तिने सांगितले आहे.

हेही वाचा – जेलमधून घरी परतताच आर्यन खानने सर्वात पहिलं केलं ‘हे’ काम, चाहते गोंधळात

यानंतरही तिला पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र तेव्हाही तिने कारण देत चौकशीसाठी येणे टाळल्याचे बोललं जात आहे. त्यामुळ आता एनसीबीकडून शाहरुखची मॅनेजर पूजाला पुन्हा एकदा समन्स पाठवला जाण्याची शक्यता आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी २९ ऑक्टोबर जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी सुटका करण्यात आली. याप्रकरणी आर्यन खानसोबत सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही जामीन मंजूर झाला आहे.

…अन् कोर्टात सुनावणी दरम्यान शाहरुख खानच्या मॅनेजरला कोसळले रडू

आर्यन खान आणि या प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर १४ अटी घालण्यात आल्या आहेत. तिघांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनदारावर आणि तत्सम रकमेच्या दोन जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अद्याप याप्रकरणाची सविस्तर चौकशी सुरु आहे.