अभिनेता अजय देवगण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. ‘बादशाहो’ या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये रंगतच होत्या. पण, सध्या मात्र अजयने त्याच्या या चित्रपटाच्या चित्रिकरणातून काढता पाय घेतल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केले आहे. एक आठवड्यापूर्वी अजयच्या आईच्या छातीमध्ये रक्त साकळल्याने त्यांना त्रास होऊ लागला होता.

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अजयच्या आईच्या फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सांताक्रुझ येथील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केल्यानंतर सध्या अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारांना त्या चांगला प्रतिसाद देत असून लवकरच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्याचेही संकेत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आईच्या प्रकृतीत अचानक असा बिघाड झाल्यामुळे अजयने तातडीने चित्रपटाच्या निर्मात्यांना विनंती करत थेट मुंबई गाठली.

यापूर्वीही अजय देवगणच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतरच अजय दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी रवाना झाला होता. त्यानंतर तेथून ‘बादशाहो’च्या चित्रिकरणासाठी तो जोधपूरला गेला होता. त्यामुळे आता अजयशिवाय बादशाहोचे चित्रिकरण पार पडणार का?, चित्रिकरणासाठी अजय पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर कधी रुजू होणार का? असेच प्रश्न अनेकांना पडत आहे.

वाचा: सलमानवरील नाराजीमुळे अजयने अवलंबला हा मार्ग?

दरम्यान, अजय देवगण, इम्रान हाश्मी, ईशा गुप्ता, विद्युत जामवाल आणि इलियाना डिक्रूज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या ‘बादशाहो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहेत. १ सप्टेंबर २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे कथानक अद्यापही गुलदस्त्यातच आहे.