बॉलिवूडमध्ये आपला जम बसवण्यासाठी अनेकांना मोठा संघर्ष करावा लागतो. आजवर अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवडूमधील त्यांचा संघर्षमयी प्रवास उलगडताना धक्कादायक अनुभव मांडले आहेत. अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी काही अभिनेत्रींना कास्टिंग काउच सारख्या अडचणींचा सामना करावा लागल्याचंही अनेकदा उघड झालंय. यातच अभिनेत्री ईशा अग्रवालने एक धक्कादायक खुलासा केला आहे. दिर्दर्शकाने केलेल्या गैरवर्तनाचा अनुभव तिने सांगितला आहे.

अभिनेत्री ईशा अग्रवालने ‘कहीं है मेरा प्यार’ या सिनेमात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि संजय कपूर यांच्यासोबत काम केलंय. तर ‘थित्तिवसल’ या तमिळ सिनेमातही ती झळकली आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत ईशा म्हणाली, ” मरोरंजन क्षेत्रात जम बसवणं सोपं नाही. इथे खूप मेहनत आहे. छोट्या शहरातून आलेल्यांना इथे लवकर स्विकारलं जात नाही शिवाय कास्टिंग काउच आहेच.” पुढे ती म्हणाली, ” मी लातूर सारख्या लहान शहरातून आलेय. त्यामुळे मुंबईत नाव कमवणं खूप कठीण आहे. खास करून ग्लॅमरस क्षेत्र आणि अभिनय क्षेत्रासात अनेक अडचणी येतात. मी मोठ्या मुश्किलीने माझ्या आई-बाबांना समजावून शिक्षण पूर्ण करून मुंबईला आले आणि ऑडिशन देऊ लागले.”

तर कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर ईशा म्हणाली, “कास्टिंग काउच प्रत्यक्षात होत. कारण जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा एका नावाजलेल्या कास्टिंग डायरेक्टरने मला ऑफिसात बोलावलं. मी माझ्या बहिणीसोबत तिथे गेले. त्याने आजवर अनेक मोठ्या सेलिब्रिटींना कास्ट केल्याचा दावा करत मलाही मोठा प्रोजेक्ट मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.”

दिग्दर्शक म्हणाला, कपडे काढ

पुढे ईशाने तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला. “भूमिकेबद्दल आमची चर्चा सुरु असतानाच त्या दिग्दर्शकाने अचानक मला माझे सगळे कपडे काढायला सांगितले जेणे करून तो माझी फिगर पाहू शकेल. भूमिकेसाठी त्याला माझी फिगर पाहणं गरजेचं असल्याचं तो म्हणाला. लगेचच मी बहिणीसोबत त्याच्या ऑफिसमधून निधुन गेले. त्यानंतर बरेच दिवस तो मला मेसेज करत होता. अखेर मी त्याला ब्लॉक केलं.” असं ईशा म्हणाली.

ईशा अग्रवालने 2019 सालात मिस ब्यूटी टॉप आफ द वर्ल्ड हा किताब पटकावला आहे. इशाने यावेळी सिनेसृष्टीत येऊ इच्छणाऱ्या नव्या तरुणींना सल्ला दिलाय. ती म्हणाली, “या क्षेत्रात तुम्हाला मोठं काम किंवा मोठे प्रोजेक्ट मिळवून देतो असे सांगणारे अनेकजण मिळतील. जे तुम्हाला भुरळ घालून फसवण्याचा प्रयत्न करतील. अशांपासून सावधान रहा. ” असं ईशाने सांगितलंय.