दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या कळपातून आलेला आणि इंडस्ट्रीवर स्वत:चा शिक्का उमटवणारा एकच हीरो आहे तो म्हणजे इम्रान हाश्मी. खुद्द भट्ट कॅम्पनेही इम्रानला सोडचिठ्ठी देऊन काही नव्या चेहऱ्यांना त्याचं स्थान देण्याचा प्रयत्न के ला, पण भट्ट कॅम्पचा चेहरा म्हणून जे यश इम्रानने मिळवलं त्याच्या जवळपासही कोणाला जाता आलं नाही. त्यामुळे इम्रान अजूनही त्यांचा चेहरा आहे. असं काय आहे इम्रानमध्ये? देखणा चेहरा, पीळदार देहयष्टी, नाचण्याचं कौशल्य नाही तर गेलाबाजार हाणामारीत तरी तो बाप असावा.. या सगळ्यात इम्रान जेमतेमच होता. पण तरीही त्याच्या अशा सामान्य असण्यातच एक ‘एक्स’ फॅक्टर आहे जो पडद्यावर कमाल करून जातो. ‘सीरिअल किसर’ म्हणून तो नावाला आला असला तरी तो त्यातच अडकून पडलेला नाही. चुंबनदृश्यं ही त्याच्यासाठी आता सहज जाता जाता करायची गोष्ट झाली आहे. आणि तरीही चुंबनदृश्यांचा ‘राजा’ असलेला हा कलाकार आपण आजही चुंबनदृश्य देताना नव्र्हस असतो, असं सांगतो..
‘राजा नटवरलाल’ या कुणाल देशमुख दिग्दर्शित चित्रपटाच्या निमित्ताने इम्रान हाश्मी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. आपल्या मुलाच्या आजारामुळे ‘घनचक्कर’नंतर इम्रानला आपोआपच चित्रपटांना स्वल्पविराम द्यावा लागला होता. पण आता तो पुन्हा एकदा परतला आहे. इम्रान समोर आल्यानंतर त्याचा कुठलाही चित्रपट असू दे आणि त्याच्यासमोर नायिका म्हणून कोणीही असू दे.. चित्रपटात चुंबनदृश्य आहे की नाही, हा पहिला प्रश्न असतो. ‘माझ्या चित्रपटात चुंबनदृश्य नसेल तर त्यात काही मजा नाही, असंच प्रत्येकाचं म्हणणं असतं. आत्तापर्यंत मी एवढी चुंबनदृश्यं दिली आहेत, की माझ्यासाठी त्यात काहीच नवीन उरलेलं नाही’, असं इम्रान म्हणतो. आणि तरीही चुंबनदृश्य देताना मी नेहमी नव्र्हस असतो, असं त्याने सांगितल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. माझ्या व्यवसायाचा एक भाग म्हणून मी ते करतो. माझ्यावर बसलेला ‘सीरिअल किसर’चा छाप माझ्या घरच्यांनाही अजिबात आवडत नाही. पण मी केवळ या व्यवसायात टिकून राहण्यासाठी ते करतो हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे खरोखरच चुंबनदृश्य द्यायचं म्हटलं की मी दिग्दर्शकाला अडवत नाही. पण ते देत असताना मी नेहमीच अवघडलेला असतो. मात्र, मी माझ्या चेहऱ्यावर ते कधीच जाणवू देत नाही. तसे झाले तर माझी सहकलाकारही अडचणीत येणार. त्यामुळे मी स्वत: हसत-खेळत राहण्याचा प्रयत्न करतो आणि माझी जी सहकलाकार असेल तिलाही मनमोकळं वाटावं हा माझा प्रयत्न असतो, असं त्याने सांगितलं.
आपला ‘सीरिअल किसर’चा किताब अलियाला द्यायला आवडेल, असं त्याने मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यावर तो म्हणतो की, मी त्या वेळी चित्रपटातून चुंबनदृश्य दिलं म्हणून किती गहजब झाला होता. आता अलिया, अर्जुन, रणवीर, दीपिका, वरुण, सिद्धार्थ हे सगळे कलाकार सर्रास चित्रपटांतून चुंबनदृश्यं देत आहेत. त्यामुळे ही पिढी चुंबनदृश्य देण्यात माझ्यापेक्षा पुढे आहे. पण अर्थात या सगळ्याची सुरुवात मी केली असल्याने अजूनही मीच त्यात ‘राजा’ आहे, असं तो म्हणतो. यातला गमतीचा भाग सोडला तर आता ‘सीरिअल किसर’ या किताबाचा मनापासून कंटाळा आला असल्याचंही त्याने कबूल केलं. आता माझ्यासाठी काहीतरी नवीन सुचवा, असंही तो सांगतो.
अयानच्या आजारपणातील दिवस शब्दबद्ध करण्याची इच्छा आहे..अयानचा म्हणजे इम्रानच्या मुलाचा विषय निघाला की तो हळवा होत नाही, तर एक संकट मागे टाकून पुढची वाटचाल सुरू केलेल्या समजूतदार वडिलांसारखा तो बोलायला सुरुवात करतो. अयानला कर्करोगाचं निदान होणं हा खूप मोठा धक्का होता. म्हणजे त्या वेळी एकापाठोपाठ एक चित्रपट हिट होत होते. भट्ट कॅ म्पच्या बाहेरही चित्रपटांना यश मिळालं होतं तेव्हाच कुठंतरी काहीतरी बिघडणार असं सतत जाणवत होतं. मात्र मुलालाच असा आजार होईल असा विचारही कधी शिवला नव्हता, असं त्याने सांगितलं. त्याला कर्करोग झाला आहे हे कळल्यावर आम्ही पार कोसळलो होतो. पण ते कोसळलेपण काही क्षणांपुरतं होतं. कारण आम्हीच जर गळून बसलो तर त्याला काय वाटेल? या एका विचाराने सगळी परिस्थिती बदलली. आमचे चेहरे नेहमीसारखे झाले. या संकटाच्या वेळी मित्र, नातेवाईक, चित्रपटसृष्टीतील सगळे जण आपल्यापाठी भक्कमपणे उभे राहिले होते. तो खूप मोठा आधार होता, असं त्याने सांगितलं. अयान चार वर्षांचा असल्याने त्याला कर्करोग या शब्दाचा अर्थ कळत नव्हता. आणि ती आमच्यासाठी फार मोठी गोष्ट ठरली. कारण एकदा अर्थ कळला की तुम्ही मानसिकदृष्टय़ा खचत जाता. त्याच्याबाबतीत ती गोष्ट घडली नाही. त्याचे उपचार झाले. तो त्यातून बाहेर पडला आणि आता शाळेत जायला लागला आहे. जणू मधले काही दिवस तो एखाद्या मोठय़ा सुट्टीवर गेला होता आणि आता परतला आहे, अशा समजुतीने तो पहिल्यासारखा वागायला लागला आहे, याबद्दल इम्रान देवाचे आभार मानतो. मात्र तरीही अयानच्या आजारपणाचे दिवस हे त्याच्या यातनांचे आणि आमच्या दु:खाचे क्षण होते. त्या दिवसांनंतर मी खूप बदललो आहे. माझ्यात काय बदल झाला आहे हे मला नेमकं कळत नाही. पण आता माझ्यासाठी जग बदललं आहे. त्याच्या आजारपणातले अनुभव शब्दबद्ध करायचा विचार असल्याचंही इम्रानने या वेळी सांगितलं.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2014 रोजी प्रकाशित
चुंबनदृश्य देताना मी नव्र्हस असतो!
दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या कळपातून आलेला आणि इंडस्ट्रीवर स्वत:चा शिक्का उमटवणारा एकच हीरो आहे तो म्हणजे इम्रान हाश्मी.

First published on: 27-07-2014 at 03:47 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emraan hashmi gets nervous during a kissing scen