निर्माते प्रदीप शिंपी यांचा ‘ऑर्केस्ट्रा शहेनशहा’ आता नव्याने पुन्हा एकदा रसिकांसाठी ‘शहेनशहा रिटर्न्स’ नावाने सादर करण्यात येणार आहे. अभिजित भट्टाचार्य, कुमार शानू, कविता कृष्णमूर्ती यांची सुरुवात येथून झाली होती. सुरुवातीला हा ऑर्केस्ट्रा ‘आलाप’ या नावाने सादर होत होता. नंतर त्याचे ‘शहेनशहा’असे नामकरण झाले. आता ‘शेहनशहा रिटर्न्स’ या नावाने नव्याने हा ऑर्केस्ट्रा सादर होणार असून १५ ऑगस्ट रोजी परळ येथील दामोदर हॉल येथे रात्री साडेआठ वाजता याचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे.
‘झरी’ चित्रपटात तीन भाषांचा संगम
लेखक व दिग्दर्शक राजू मेश्राम यांच्या ‘झरी’ या आगामी मराठी चित्रपटात वऱ्हाडी, तेलुगू आणि छत्तीसगढी अशा तीन भाषांचा संगम पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला इंग्रजी उपशीर्षकेही देण्यात येणार आहेत. चित्रपटात पाहायला मिळणाऱ्या या तीन भाषांसाठी त्या त्या भाषेतील तज्ज्ञ मंडळींची मदत घेण्यात आली आहे. चित्रपटात वेगवेगळ्या राज्यांतून आलेली माणसे आणि त्यांचे संवाद दाखविण्यात आले असून ती माणसे त्यांच्याच भाषेत बोलताना दिसावी, म्हणून हा प्रयोग करण्यात आला आहे. चित्रपटात नागेश भोसले, अनंत जोग, मिलिंद शिंदे, नम्रता गायकवाड, तुकाराम बीडकर, निशा परुळेकर आणि अन्य कलाकार आहेत.
‘मनातल्या उन्हात’
अमेरिकेतील ‘फेस्टिव्हल ऑफ ग्लोब’ या चित्रपट महोत्सवासाठी ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटाची निवड झाली आहे. हा महोत्सव कॅलिफोर्निया येथे सुरू झाला असून तो येत्या १६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव हे असून चित्रपटाची निर्मिती आनंद सागर प्रॉडक्शनच्या विजयश्री पाटील यांची आहे.
‘प्रेमकहाणी-एक लपलेली गोष्ट’
सतीश रणदिवे दिग्दर्शित ‘प्रेमकहाणी-एक लपलेली गोष्ट’ या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरचे नुकतेच एका कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. या वेळी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. महाराष्ट्र आणि राजस्थान अशा दोन संस्कृतींचे दर्शन या चित्रपटातून घडणार आहे. चित्रपटात काजल खान, फैजल खान, उदय टिकेकर, किशोरी शहाणे-वीज, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, समीरा गुजर, डॉ. विलास उजवणे आणि अन्य कलाकार आहेत.
झी टॉकीजवर ‘फॅण्ड्री’
‘फॅण्ड्री’ हा गाजलेला चित्रपट १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६.३० वाजता झी टॉकीजवर प्रसारित करण्यात येणार आहे.
किल्लारी भूकंपावरील चित्रपटात जॅकी श्रॉफ
मुंबई :१९९३ साली ३० सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी लातूर परिसरात प्रचंड भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्र किल्लारी गावात होते. याच विषयावर ‘३:५६ किल्लारी’ हा मराठी चित्रपट केला जाणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त महेश मांजरेकर यांच्या हस्ते झाला. जॅकी श्रॉफ, सई ताम्हणकर, पंकज विष्णू, बालकलाकार गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गिरीश साठे असून दिग्दर्शन विजय मिश्रा व दीपक भागवत करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2015 रोजी प्रकाशित
मनोरंजन : ऑर्केस्ट्रा ‘शहेनशहा रिटर्न्स’
निर्माते प्रदीप शिंपी यांचा ‘ऑर्केस्ट्रा शहेनशहा’ आता नव्याने पुन्हा एकदा रसिकांसाठी ‘शहेनशहा रिटर्न्स’ नावाने सादर करण्यात येणार आहे.
First published on: 09-08-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entertainment news in short