Film Announced On Raja Raghuvanshi Murder Case : लग्नानंतर मेघालय येथे मधुचंद्रासाठी पत्नीसह गेलेल्या राजा रघुवंशीची हत्या झाली होती. पत्नीसह मधुचंद्रासाठी गेल्यानंतर १० दिवस राजा रघुवंशी बेपत्ता होता. त्यानंतर २ जून रोजी त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. त्यावेळी सोशल मीडियासह सर्वत्र याबद्दल प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर अभिनेता आमिर खान यावर चित्रपट बनवणार, असं म्हटलं गेलं. परंतु, आता या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.
बॉलीवूड अभिनेता आमिर खान मेघालयमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर चित्रपट काढणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, नंतर अभिनेत्यानं तो असा कोणताही चित्रपट काढणार नसल्याचं त्यानं स्वत: स्पष्ट केलं. अशातच आता राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर दिग्दर्शक एसपी निंबावत चित्रपट बनवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
राजा रघुवंशीच्या मोठ्या भावाची प्रतिक्रिया
एसपी निंबावत यांनी या चित्रपटाचं नाव सध्या ‘हनिमून इन शिलाँग’ असं ठेवलं आहे. त्यासह राजा रघुवंशीचा मोठा भाऊ सचिनने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘रेडीफ’च्या वृत्तानुसार तो म्हणाला, “आमची या चित्रपटासाठी संमती आहे. जर यावर चित्रपट बनवण्यात आला, तर खरं वा खोटं याचा खुलासा होईल आणि कोण बरोबर आहे, तसेच कोण चुकीचं हेही लोकांना कळेल, असा आमचा विश्वास आहे.”
चित्रपटाच्या दिग्दर्शकांची प्रितिक्रिया
चित्रपटाचे दिग्दर्शक एसपी निंबावत यांनीसुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत हा संदेश द्यायचा आहे.” पुढे दिग्दर्शकांनी कलाकारांची नावे स्पष्ट न करता, चित्रपटाची स्क्रिप्ट तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “चित्रपटाचं ८० टक्के चित्रीकरण इंदोर येथे होईल आणि २० टक्के मेघालयातील काही ठिकाणी करण्यात येईल”.
राजा रघुवंशी इंदोर येथील उद्योजक होता. सोनमसह त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर हे नवदाम्पत्य मेघालय येथे मे महिन्यात मधुचंद्रासाठी गेलं होतं. त्यानंतर राजा रघुवंशी बेपत्ता होता. नंतर काही दिवसांनी २ जून रोजी सोहरा या परिसरात त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या संदर्भात राजा रघुवंशीची पत्नी सोनमसह आठ लोकांना अटक केली आहे.