‘केदारनाथ’च्या अडचणीत वाढ , दिग्दर्शक-निर्मात्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

सैफ अली खानची मुलगी सारा अली ‘केदारनाथ ‘मधून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरत असलेला चित्रपट ‘केदारनाथ’ अडचणीत सापडला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, सैफ अली खानची मुलगी सारा अली ‘केदारनाथ’मधून पहिल्यांदाच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अडचणीत सापडला आहे. पद्मा फिल्म्सच्या अनिल गुप्ता यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शक-निर्मात्यांविरोधात १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी क्रिआर्ज एन्टटेन्मेंटविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला आहे.

अनिल गुप्ता यांनी तक्रार दाखल केल्यानंतर अभिषेक कपूर आणि प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात कलम ४२०,४६७,१२०b,३४ अंतर्गत कारवाईला सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अनिल गुप्ता यांनी केलेले आरोप क्रिआर्ज एन्टटेन्मेंटने फेटाळून लावले आहेत. ‘अनिल यांनी केलेली तक्रार खोटी आहे. त्यांच्या या अशा तक्रारींमुळे आम्ही कंटाळलो आहोत’, असं अभिषेक कपूर यांनी म्हटलं आहे.

‘केदारनाथ’ हा चित्रपट येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून साराबरोबर अभिनेता सुशांत सिंह राजपूत स्क्रिन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या दोघांनीही भैरवनाथ, केदारनाथ मंदिरामध्ये चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. मात्र तरीदेखील त्यांच्या मार्गातील अडथळे काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fir against kedarnath prerna arora and director abhishek kapoor