बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय जोडपं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघंही विवाहबंधनात अडकले आहे. इटलीत पार पडलेल्या या शाही विवाहाची चर्चा गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर होती. त्यातूनच लाडक्या जोडप्याचे फोटो पाहण्यास बॉलिवूडसह त्यांचे जगभरातील तमाम चाहतेही उत्सुक होते. अखेर हे फोटो समोर आले आहेत. त्यासाठी २४ तासांहून अधिक काळ या जोडप्यांनी चाहत्यांना प्रतीक्षा करायला लावली.
या फोटोत दोघंही सुंदर दिसत असून अगदी लक्ष्मी नारायणासारखा दोघांचाही जोडा शोभून दिसतोय अशाही प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. आधी कोंकणी आणि मग सिंधी पद्धतीनं या दोघांचा विवाह १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरात असलेल्या एका आलिशान व्हिलामध्ये पार पडला. या लग्नातले फोटो कुठेही व्हायरल होणार नाही याची दक्षता दोघांनीही घेतली होती. त्यामुळे लग्नाला २४ तासांहून अधिक काळ उलटल्यानंतरही दोघांचा एकही फोटो समोर आला नव्हता.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) November 15, 2018
लग्नाचे किंवा लग्नातल्या कोणत्याही विधीचे फोटो आपल्या कॅमेरात कैद करून ते सोशल मीडियावर पोस्ट करू नये अशी विनंतीवजा अट दोघांनी पाहुण्यांपुढे ठेवली होती. यासाठी लग्नाला उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मोबाइल कॅमेरा हे विशिष्ट स्टिकर्स लावून झाकण्यात आले होते. पाहुण्यांनी अधिकृत छायाचित्रकारानं काढलेलेच फोटो शेअर करावे अशी दोघांची इच्छा होती, म्हणूनच त्यांनी इतकी खबरदारी घेतली असल्याचं समजत आहे. अखेर फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी या जोडप्यांना आशीर्वाद देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर रणवीर दीपिका मुंबईत परतणार आहे. मुंबईत २८ नोव्हेंबर रोजी त्यांची जंगी रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूड उपस्थित राहणार आहे.