dilip thakurचित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे जेवढे व जसे महत्त्वाचे तसेच त्या दिग्दर्शकाने निवडलेल्या शैलीवर प्रेक्षकांचा विश्वास बसणेही तेवढेच महत्त्वाचे! राजीव राय अगदी तसाच दिग्दर्शक. त्याच्या सुपर हिट चित्रपटांच्या नावांवर सहज नजर टाकली तरी तो मल्टी स्टार कास्ट चित्रपटाची आपल्या स्टायलिश शैलीत मेजवानी घेऊन येण्यात तो यशस्वी ठरल्याचे दिसतेय. ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘मोहरा’, ‘गुप्त’ या नावावरून बरेच काही सुचित होतेय ना? दोन घटका महामनोरंजनाची हमी या चित्रपटांनी दिली. नेमके काय पाहिले हे पटकन सांगताही येणार नाही वा सांगावेसे वाटणारही नाही. ग्लॅमर आहे, गीत-संगीत, नृत्य, रहस्य आहे, मारधाड आहे, डायलॉगबाजी, थरारक क्लायमॅक्स आहे. शक्य तेथे आचरटपणाही आहे, हे तर त्या काळात इतरही अनेक चित्रपटातून वारंवार दिसे. पण तरीही राजीव रायचे चित्रपट रसिकांकडून नेहमीच स्वीकारले गेले. कारण ही मिसळ वा भेसळ रंजक आहे यावर प्रेक्षकांचा विश्वास होता. तोच तर महत्त्वाचा असतो. यातील तीन चित्रपटात नसिरुद्दीन शाह होते. या बुद्धिमान अभिनेत्याने मुख्य प्रवाहातील एखाद्या दिग्दर्शकाच्या तब्बल तीन चित्रपटात भूमिका करणे हेच केवढे तरी विशेष. अगदी सोनमसोबत तो ‘तिरछी टोपीवाले… ओये ओये’ नाचलाही धमाल.

राजीव रायचा पहिला चित्रपट ‘युध्द’ पण तो तितकासा जमला वा रंगला नाही. पण ‘त्रिदेव’पासून त्याने आपली शैली जमवली अथवा विकसित केली. त्याचे पिता गुलशन राय हे चित्रपट निर्मितीमधील (त्रिमूर्ती फिल्म) आणि वितरण क्षेत्रातील (मॉडर्न मुव्हीज रिलीज) एक मोठे नाव. त्यांचा पुत्र असल्याचा राजीव रायला फायदाही झालाच. पण त्यानेही आपली ओळख निर्माण केली हे महत्वाचे.

ताडदेवच्या कार्यालयाखाली गँगस्टरकडून झालेल्या हल्ल्यात राजीव राय सुदैवाने बचावला. पण त्याचा दिग्दर्शनातील सूर कायमचा हरवलाय. ‘गुप्त’नंतरचे त्याचे चित्रपट भरकटत गेले… ‘ओये ओये’ म्हणताच राजीव राय आठवतो हे महत्त्वाचे. मनोरंजक चित्रपटाचा हा जणू हुकमी ‘मोहरा’.

दिलीप ठाकूर