‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवणारी भारतीय वंशाची अभिनेत्री फ्रिडा पिंटो ही अगदी कमी कालावधीमध्ये हॉलिवूडमध्ये प्रसिद्धीस आली. त्यामुळे तिचा चाहतावर्ग केवळ देशातच नाही तर विदेशातही आहे. सोशल मीडियावर अनेकांच्या गळ्यातलं ताईत असलेल्या फ्रिडाने नुकताच साखरपुडा केला असून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने ही माहिती चाहत्यांना दिली. ही माहिती शेअर करण्यासोबतच तिने तिच्या जोडीदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

“आता खऱ्या अर्थाने जीवनाला अर्थ मिळाला आहे असं वाटतंय. आयुष्य, हे जग, ते डोळ्यातील अश्रू सारं काही समजू लागलं आहे. माझ्या हुशार प्रियकराने प्रेमाविषयी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्या साऱ्या आता लक्षात येऊ लागल्या आहेत. आता मला जबाबदारी समजू लागली आहे. माझ्या जीवनात तुझ्या सारख्या चांगल्या व्यक्तीचं आगमन झालं आहे. त्यामुळे कायम तुला माझ्यासोबत ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, अशी एक पोस्ट फ्रिडाने शेअर केली.


दरम्यान, फ्रिडाने अॅडव्हेंचर फोटोग्राफर कोरी ट्रॅनसोबत साखरपुडा केला असून तिने पोस्ट शेअर केल्यानंतर तिचा साखरपुडा झाल्याचं साऱ्यांच्या लक्षात आलं. फ्रिडा लोकप्रिय अभिनेत्री असून तिची स्लमडॉग मिलेनियरमधील भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटाव्यतरिक्त ती ‘तृष्णा’, ‘ब्लॅक गोल्ड’, ‘नाईट ऑफ कप्स’, ‘डेजर्ट डान्सर’, ‘लव सोनिया’, ‘मोगली’ यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.