बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलियाला ओळखले जाते. जिनिलियाने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र लग्नानंतर तिने काही काळासाठी या सर्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिचे अनेक चाहते जिनिलिया पुन्हा चित्रपटात कधी दिसणार? असा प्रश्न उपस्थित करत होते. अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. तब्बल १० वर्षांनी जिनिलिया पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे पुन्हा पदार्पणासाठी तिने चक्क मराठी चित्रपटाची निवड केली आहे.

जिनिलिया आणि रितेश या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. नुकतंच जिनिलियाने तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टरही शेअर केले आहे. जिनिलिया पुन्हा पदार्पण करत असलेल्या मराठी चित्रपटाचे नाव ‘वेड’ असे आहे. नुकतंच तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.

या व्हिडीओला कॅप्शन देताना ती म्हणाली, “गेल्या काही वर्षात मी अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. त्यात तुमच्या सर्वांकडून आशीर्वादरुपी आदर आणि प्रेम मिळाले. माझा जन्म महाराष्ट्रात झाल्यामुळे मराठी चित्रपट करण्याची इच्छा वर्षानुवर्षे माझ्या मनात होती. तशी एखादी स्क्रिप्ट मिळावी, असेही मला वाटत होते. अखेर तो क्षण आला. माझा पहिला मराठी चित्रपट…, मी तब्बल १० वर्षांनी अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करत आहे. हे स्वप्नवत आहे.”

“तर दुसरीकडे माझे पती रितेश देशमुख हे पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच मी या चित्रपटात अभिनेत्री जिया शंकरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. त्यामुळे मी तुमच्या प्रत्येकाकडून नम्रपणे आशीर्वादाची विनंती करत आहे. कारण एखादा चित्रपट हा नेहमीच प्रवास असतो आणि त्या संपूर्ण प्रवासात तुम्ही आमच्यासोबत असाल तर आम्हाला नक्की आवडेल,” असे जिनिलिया म्हणाली.

रितेश देशमुख वेगळ्या भूमिकेत

दरम्यान वेड या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेड या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. मुंबई फिल्म कंपनीने आज ६ व्या मराठी चित्रपटाची घोषणा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.