जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिचं ‘दोन स्पेशल हे नाटक रंगभूमीवर गाजतआहे. ही हरहुन्नरी अभिनेत्री बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहवरील ‘गं सहाजणी’ या मालिकेतून पुनरागमन करण्यासाठी गिरीजा सज्ज आहे. एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका येत्या १० ऑक्टोबर पासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे.
या मालिकेत गिरीजा ओक ‘विद्या विसपुते’ ही व्यक्तिरेखा साकारतआहे. बँकेची ब्रांच हेड असलेली विद्या विसपुते साधी, सरळ आणि समजूतदार अधिकारी आहे. बँकेतल्या लोकांनी चुका कराव्यात आणि तिने उदार मनाने त्या सांभाळून घ्याव्यात अशी तिची आदर्श व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेसाठी गिरीजाही उत्सुक आहे. दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची ‘गं सहाजणी’ ही कलाकृती प्रेक्षकांना निखळ आनंद देणारी, मनोरंजक आहे. गिरीजा ब्रांच हेड असलेल्या या बँकेत शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पौर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोंडवळकर या अभिनेत्री मुख्य पदांवर आहेत. रोजच्या जीवनातील दगदग, समस्या आणि नोकरीवर जाणाऱ्या महिलांचं भावविश्व मांडणारी ही मालिका आहे. या ‘सहाजणी’ मिळून काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
स्टार प्रवाहच्या ‘गं … सहाजणी’ या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे करत असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन येत आहेत. १० ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत आहे. प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या कलाकृती पुरुषोत्तम बेर्डे यांनी या आधी निर्माण केल्या आहेत. निर्मळ विनोद आणि तिरकस विचार ही त्यांची खासियत. त्यामुळे ‘गं … सहाजणी’ काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नुकताच या मालिकेचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे त्याला प्रेक्षकांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.