बॉलीवूडचा हीरो नं. १ म्हणजेच अभिनेता गोविंदा मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. लग्नाच्या ३७ वर्षांनंतर गोविंदा पत्नी सुनीता आहुजा यांच्याबरोबर घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत होत्या.
परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीता यांनी त्या बातम्यांचं खंडन केलं होतं. तसेच त्यांनी ट्रोल करणाऱ्यांनादेखील चांगलंच सुनावलं. गोविंदा आणि सुनीता यांनी आतापर्यंत याबद्दल काहीही सांगितलं नसलं तरी, अलीकडच्या एका मुलाखतीत सुनीता यांनी काही गुपितं उघड केली आहेत.
डेक्कन टॉक्स विथ आसिफला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी पहिल्यांदाच त्यांच्या नात्याची स्थिती सांगितली. त्या म्हणाल्या, “कोणाची तरी त्यांच्या नात्याला वाईट नजर लागली आहे. कोणीही माझ्या पतीला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही”.
सुनीता आणि गोविंदाचं लग्न एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं. एकीकडे गोविंदा बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करत असताना, दुसरीकडे सुनीता यांच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हते. विशेषतः त्यांचे वडील या नात्याला तीव्र विरोध करीत होते.
माझ्या वडिलांना कधीच वाटत नव्हतं की, मी गोविंदाशी लग्न करावं. ते माझ्या लग्नालाही उपस्थित राहिले नाहीत. चित्रपटसृष्टीत जीवन कसं असतं हे त्यांना माहीत होतं. त्यांनी माझ्यासाठी हॉलंडमध्ये एक मुलगा बघितला होता, तो एक बिझनेसमॅन होता; पण माझं प्रेम खरं होतं. मी १५ वर्षांची होते जेव्हा गोविंदाच्या प्रेमात पडले.
सासूमुळे आमचं लग्न टिकलं: सुनीता आहुजा
सुनीता यांचे स्वतःचे वडील या नात्याविरुद्ध होते; पण गोविंदाची आई, सुनीता यांच्या सासूबाईंनी हे नातं केवळ स्वीकारलंच नाही, तर ते आणखी मजबूत केलं. सुनीता म्हणाल्या की, त्यांच्या सासूनंच गोविंदाला हे नातं टिकवून ठेवण्यासाठी प्रेरित केलं. जेव्हा गोविंदा आणि माझं लग्न झालं तेव्हा तो त्याच्या कुटुंबाबरोबर राहत होता; पण माझं त्याच्यावर प्रेम होतं. माझ्या सासूबाईंमुळे मी अजूनही त्याच घरात राहतेय. त्या एकदा गोविंदाला म्हणाल्या, “चिची, जर तू सुनीताला सोडून गेलास तर तू भिकारी होशील. मला अजूनही त्यांचं हे वाक्य आठवतं”, असं सुनीता आहुजा म्हणाल्या