बॉलिवूडमधील एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हंसल मेहता ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. पण चित्रपटांपेक्षा जास्त हंसल मेहता हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेकदा चर्चेत असतात. आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हंसल मेहता यांनी ट्वीटरवर प्रतिक्रिया देत वानखेडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता हे विविध कारणामुळेच चर्चेत असतात. आर्यन खानला अटक केल्यानंतरही त्यांनी काहीतरी वादग्रस्त विधान केले होते. यानंतर आता समीर वानखेडेंवर लाच मागितल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी ट्वीट करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

“समीर वानखेडेंवर करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. जोपर्यंत हे आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत वानखेडेंनी राजीनामा द्यावा. ज्यांना त्यांनी अटक केली आहे त्यांनीच आपलं निर्दोषत्व सिद्ध का करावं?” असे ट्वीट हंसल मेहतांनी केले आहे.

दरम्यान यापूर्वीही आर्यन खानला अटक झाल्यानंतर हंसल मेहता यांनी एक ट्वीट केलं होतं. त्याचं ट्वीट चांगलच चर्चेत आलं होतं. त्यावेळी ते म्हणाले, “गांजा किंवा भांगचं सेवन अनेक देशांमध्ये कायदेशीर आहे. अनेक ठिकाणी याला गुन्हा समजलं जात नाही. आपल्याच देशात मात्र याचा वापर नारकोटिक्स कंट्रोल पेक्षा जास्त छळ करण्यासाठी अधिक केला जातो. ज्याप्रकारे ३७७ कलम हटवण्यासाठी आंदोलन केलं गेलं तसंच हा खोडसळपणा बंद करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे.”असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक माहिती उघड केली आहे.

“अनेक देशात गांजाचं सेवन कायदेशीर, आपल्याच इथे…”; आर्यन खानच्या अटकेवर हंसल मेहतांच वादग्रस्त विधान

या प्रकणातील दुसरे पंच के. पी. गोसावी आणि सॅम डिसूझा यांचे दूरध्वनीवरील संभाषण मी ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत व्यवहार अंतिम करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असे संभाषण दोघांमध्ये झाल्याचा प्रभाकर यांचा दावा आहे. आपण के.पी. गोसावी यांचे अंगरक्षक असल्याचा दावाही प्रभाकर यांनी केला आहे. क्रुझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी आणि के. पी. गोसावी तसेच सॅम यांना निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही प्रभाकर यांनी केला आहे.