बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण लंडन येथील मादाम तुसा संग्रहालयात करण्यात आले. कतरिनानेच तिच्या पुतळ्याचे अनावरण केले. पुतळ्यासमोर आली असताना तिने हा पुतळा अगदी माझ्यासारखाच आहे असे उद्गार काढले.
कतरिना कैफ हिची आई ब्रिटिश व वडील काश्मिरी आहेत. मादाम तुसा संग्रहालयाच्या संकेतस्थळावर पंजाब रेडिओच्या मदतीने मतदान घेण्यात आले होते त्यात कतरिनाला २२५००० मते मिळाली होती व तिने प्रियांका चोप्रा व दीपिका पदुकोण यांना मागे टाकले होते. त्यानंतर तिचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला.
यापूर्वी लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात अमिताभ बच्चन (२०००), ऐश्वर्या राय (२००४), शाहरूख खान (२००७), सलमान खान (२००८), हृतिक रोशन (२०११), माधुरी दीक्षित-नेने (२०१२) यांचे मेणाचे पुतळे तयार करण्यात आले आहेत.
२० शिल्पकारांनी कतरिनाचा पुतळा तयार केला असून त्याला ४ महिने लागले. या पुतळ्याची किंमत दीड लाख पौंड आहे. मादाम तुसा स्टुडिओ लंडनमध्ये असून १५० वर्षांत तेथे अनेक पुतळे
तयार केले आहेत. मादाम तुसा संग्रहालय हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.