नीरज पांडे दिग्दर्शित एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार खेळी करताना दिसतो आहे. या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने साकारलेल्या एम. एस. धोनीचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. सुशांतने धोनीच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे, अशा शब्दांमध्ये सुशांतवर स्तुतीसुमनांचा वर्षाव सुरू आहे. मात्र धोनीची पत्नी साक्षीला चित्रपटातील कियारा अडवाणीचा अभिनय सर्वाधिक आवडला आहे. कियाराने चित्रपटात साक्षीचीच भूमिका साकारली आहे.
पडद्यावर साक्षी धोनी साकारणाऱ्या कियारा अडवाणीचे खऱ्याखुऱ्या साक्षी धोनीने अगदी तोंड भरुन कौतुक केले आहे. ‘कियाराने चित्रपटात साक्षी अगदी तंतोतंत साकारली आहे. साक्षी खऱ्याखुऱ्या आयुष्यात अशीच आहे,’ असे म्हणत साक्षी धोनीने कियाराच्या अभिनयाला पसंतीची पावती दिली आहे.
साक्षी धोनी कियाराचे फक्त कौतुकच करुन थांबली नाही. पडद्यावर साक्षी साकारणाऱ्या कियाराचे कौतुक करणारे अनेक मेसेज सध्या साक्षी धोनीला तिच्या मित्रपरिवाराकडून येत आहेत. साक्षीने हे सर्व कौतुकाचे मेसेज साक्षीने कियारासोबत शेअर केले आहेत. खऱ्याखुऱ्या साक्षीने केलेले कौतुक कियारासाठी खूपच स्पेशल ठरले आहे.
कियाराने साक्षी धोनी साकारण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. नीरज पांडे यांनी चित्रपटासाठी निवड केल्यावर कियाराने प्रथम साक्षी धोनीला संपर्क साधला. साक्षीचे आयुष्य, तिचा प्रवास, धोनी याविषयी कियाराने साक्षीसोबत चर्चा केली. साक्षीची आवड निवड, तिचे छंद, तिचा स्वभाव जाणून घेता घेता कियारा साक्षीची चांगली मैत्रीणदेखील बनली. या सगळ्याचा फायदा कियाराला पडद्यावर साक्षी साकारताना झाला.
ज्यावेळी एम. एस. धोनी चित्रपटाचे जब तक गाणे प्रसिद्ध झाले, तेव्हा साक्षीने सर्व प्रथम कियाराचे कौतुक केले होते. ‘पडद्यावर सुशांत आणि तुझी केमिस्ट्री चांगली आहे. मी आणि धोनी प्रत्यक्ष आयुष्याच असेच आहोत’, या शब्दांमध्ये साक्षी धोनीने कियाराचे कौतुक केले होते. ज्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे, त्या व्यक्तीकडूनच कौतुक होणे, हा अनुभव अविस्मरणीय असतो. त्यामुळेच कियारा अडवाणी सध्या प्रचंड आनंदात आहे.