रसिका शिंदे-पॉल

हिंदूी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतही चरित्रपट साकारले जात आहेत. अभिनेते, राजकीय व्यक्ती किंवा मग इतिहासातील व्यक्तिरेखा अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे जीवन आपल्या अभिनय आणि दिग्दर्शकीय कौशल्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी करत आहेत. मराठीतील गाजलेल्या चरित्रपटांच्या यादीत ‘धर्मवीर’ या चित्रपटाचे नाव सध्या अग्रणी आहे. या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारून अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्यातील अभिनय कौशल्याची नवी बाजू प्रेक्षकांसमोर मांडली. त्याने साकारलेल्या या भूमिकेला महाराष्ट्रभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. गाजलेल्या व्यक्तीची भूमिका साकारल्यानंतर प्रसाद ओक पडद्याआड असलेल्या एका सामान्य व्यक्तीची असामान्य गोष्ट मोठय़ा पडद्यावर उलगडणार आहे.

‘परिनिर्वाण’ सारखे चित्रपट वारंवार होत नाहीत आणि प्रत्येक कलाकाराला पुन्हा पुन्हा इतक्या अभिनयाच्या दृष्टीने ताकदशीर भूमिका मिळत नाहीत. अभिनय, दिग्दर्शन, कथा सगळय़ाच बाबतीत विविध कंगोरे असलेल्या ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान आहे, असं प्रसाद सांगतो. ‘दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मला एखाद्या काळात रमायला आवडतं. परिनिर्वाण हा शब्द ऐकल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मनात आलं की हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित किंवा त्यांच्या महापरिनिर्वाणासंदर्भातील चित्रपट आहे का? परंतु प्रत्यक्षात चित्रपटाचे कथानक हे बाबासाहेबांचे परिनिर्वाण कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे हे समजलं तेव्हा किती वेगळय़ा विषयावरचा चित्रपट आहे याची जाणीव झाली. असा वेगळय़ा शैलीचा चित्रपट आत्तापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत आला नसल्यामुळे तो स्वीकारावा असं मनात आलं. दिग्दर्शक आणि लेखकाने या विषयासाठी जी मेहनत घेतली आहे तीही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा एक भाग होता आणि दुसरं म्हणजे महामानवाचे परिनिर्वाण कसे होते ते पुढच्या अनेक पिढय़ांनाही कळले पाहिजे. त्यासाठी तो प्रसंग जतन झाला पाहिजे हा विचार मुळात ज्यांच्या मनात आला त्या नामदेव व्हटकरांची ओळखही लोकांना व्हायला पाहिजे हाच एक ध्यास मनात आहे’ असे प्रसादने सांगितले.

चिकाटी आणि जिद्द महत्त्वाची

नामदेव व्हटकर यांचं व्यक्तित्व मुळातच अचाट आहे. आवड आणि जिद्द जर का तुमच्या अंगी असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करू शकता हे त्यांच्या आयुष्यातून शिकायला मिळतं, असं सांगतानाच नामदेव व्हटकर यांची ओळख ही केवळ परिनिर्वाण यात्रा कॅमेऱ्यात कैद करणारी व्यक्ती इथपर्यंतच सीमित न राहता ते स्वत: लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, अभिनेते, शेतकरी, आमदार होते. त्यामुळे अभिनेता किंवा दिग्दर्शक म्हणून त्यांचा प्रवास आणि आपल्या अंगी असलेल्या बहुप्रतिभेचा त्यांनी केलेला सुंदर वापर हे सगळं या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार असल्याचंही त्याने सांगितलं. ‘सच्च्या कलावंताच्या अंगी असलेली चिकाटी ही नामदेव व्हटकर यांच्या या कार्यातून दिसून येते तीच चिकाटी माझ्याही अंगी आहे. त्यामुळे तांत्रिक आधुनिकीकरण नसताना ३००० फुटांच्या रिळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची परिनिर्वाण यात्रा कैद करण्याचा विचार ज्या मनात आला त्यांच्या मनाचा शोध देखील एक अभिनेता म्हणून या चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न करतो आहे’ अशी कबुलीही प्रसादने दिली.

.. आणि मी प्रेमात पडलो

कोणत्याही विषय आणि आशयावर आधारलेला चित्रपट दिग्दर्शित किंवा निर्मिती करताना असंख्य अडचणींचा सामना आजही तंत्रज्ञानाच्या युगात करावा लागतो आहे. मी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटासमोर मोठी आव्हाने होती, आर्थिक अडचणी होत्या. २१ व्या शतकातही जर या आव्हानांचा सामना दिग्दर्शक, कलाकार, निर्माते यांना करावा लागत असेल तर १९५६ साली नामदेव व्हटकर यांना आंबेडकरांच्या परिनिर्वाणाचे चित्रीकरण करावं हे सुचणंसुद्धा कौतुकास्पदच आहे, असे म्हणत ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाच्या प्रेमात पडल्याचे प्रसादने सांगितले.

नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध मनोरंजनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष सातत्याने काम करणाऱ्या प्रसाद ओकने आत्तापर्यंत ९० मालिका आणि ९६ चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आत्तापर्यंतच्या या प्रवासाबद्दल बोलताना प्रसाद म्हणतो, ‘मुंबईत स्थायिक होऊन २८ वर्ष झाली. जेव्हा मनोरंजनाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्यावेळी विचार करण्याइतपत वेळ नव्हता, कारण मुंबईत आल्यानंतर संसार वाढला. कौटुंबिक आणि व्यावसायिक या दोन्ही जबाबदाऱ्या वाढल्यामुळे हाती येईल ते काम स्वीकारून चार पैसे कमवायचे इतकंच तेव्हा डोक्यात असायचं. माझे आणि पत्नीचे वडील हयात नसल्यामुळे दोन्ही कुटुंबांची आर्थिक जबाबदारी देखील माझ्या खांद्यावर होती. त्यामुळे निदान त्यावेळी तरी आवडीचे काम निवडण्याची मुभा नव्हती. पदरी आलेली प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे केली’, अशी कबुली प्रसादने दिली. मात्र, आज माझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखा, चित्रपट हे माझ्या त्याच प्रामाणिकपणाचं फळ आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली. आता मला भूमिका, चित्रपट, चित्रपटाच्या कथा निवडण्याची मुभा मिळाली असल्याचा आनंद आहे, असेही त्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चरित्रपटाची सोप्पी व्याख्या

चरित्रपट पाहिल्या पाहिल्या तो माणूस समजला पाहिजे अशी चरित्रपटाची सोप्पी व्याख्या प्रसादने सांगितली. कुठल्याही व्यक्तीचा चरित्रपट पाहताना अडीच ते तीन तासांत ती व्यक्ती समग्र कळली तर तो चरित्रपट सफल झाला, असं तो मानतो. ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चरित्रपट साकारायचा आहे त्याच्या आयुष्यातील दहा, वीस, पंचवीस किंवा त्याहून जास्त वर्ष कमीत कमी वेळात दाखवण्याचं कौशल्य दिग्दर्शकाकडे आणि कथेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं कौशल्य लेखकाकडे असेल तर तो चरित्रपट परिपूर्ण होतो आणि प्रेक्षकांना भावतो, असंही त्याने सांगितलं. त्यामुळे दिग्दर्शन, लेखन, कलाकार या सर्व घटकांचा एकमेकांशी तंतोतंत मेळ जुळला तर चरित्रपट यशस्वी होतो, हे प्रसाद आग्रहाने नमूद करतो.