Utkarsh Shinde Post on Hindi Controversy : महाराष्ट्रात इयता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. सरकारने आधी हिंदी शिकणं अनिवार्य केलं होतं. मात्र, जनतेच्या विरोधानंतर सरकारने अनिवार्य शब्द हटवला. अनेक स्तरातून हिंदी भाषा सक्ती नको याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे, अनेकांनी या निर्णयाला ठाम विरोध केला आहे.

हिंदी सक्तीबद्दल मराठी कलाक्षेत्रातूनही अनेक कलाकार मंडळी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हिंदी भाषेच्या सक्तीवर अनेक कलाकारांनी त्यांच्या स्पष्ट भूमिका व्यक्त केल्या आहेत. अशातच प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदेने हिंदी भाषेच्या निर्णयावर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच त्याचे अनेक फोटो-व्हिडीओही शेअर करत असतो. त्याचबरोबर उत्कर्ष सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतो. अशातच हिंदी सक्तीबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

गायक उत्कर्ष शिंदेची इन्स्टाग्राम पोस्ट

या पोस्टमध्ये उत्कर्ष म्हणतो, “ज्ञानाची भक्ती करायची असते सक्ती नाही… मराठी माणूस अन्य अमराठी भाषेचा सन्मान करतो, म्हणजे माय मराठीचा अपमान सहन करेल या भ्रमात राहू नका. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याने पाहुणचार घ्यावा, घराचा मालक होण्याचा प्रयत्न करू नये. हाच महाराष्ट्र हीच मराठी अस्मिता घेऊन अटकपर्यंत पोहोचला होता. मराठीचा इतिहास पुन्हा एकदा वाचून घ्या.”

या पोस्टसह उत्कर्षने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला टॅग केलं आहे. तसंच मोर्चा आणि फुल्ल सपोर्ट असे हॅश्टॅगही लिहिले आहेत. तर एक फोटोसुद्धा शेअर केला आहे, ज्यात एक शाळकरी मुलगा पाहायला मिळत आहे आणि हा मुलगा ‘तुम्हाऱ्या भाषेचा सन्मान करेनच, पण माझ्या माय मराठीचा अपमान खपवून घेणार नाही.” असं म्हणताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उत्कर्षने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी “फक्त मराठी”, “अगदी खरं बोललात भाऊ”, “महाराष्ट्रात फक्त मराठी आणि मराठीच” अशा अनेक कमेंट्स करत त्याला पाठींबा दिला आहे. उत्कर्षबद्दल बोलायचं झालं तर तो एक गायक, संगीतकार आणि गीतकार आहे. त्याने ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमध्ये सहभाग घेतला होता.