सुप्रसिद्ध पॉप सिंगर हनी सिंग याच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने दाखल केलेल्या कौटुंबिक अत्याचाराच्या याचिकेवर आज सुनावणी होती. घरगुती हिंसा प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हनी सिंगची पत्नी शालिनी कोर्टरूममध्ये अंतःकरणाने तुटून गेलेली होती. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात महानगर दंडाधिकारी तानिया सिंग यांच्यासमोर न्यायासाठी याचना करत पत्नी शालिनीला अक्षरशः रडू कोसळलं. शालिनीची अवस्था पाहून न्यायालयाने देखील तिच्या मानसिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. “माझ्याकडे पर्याय नाही. मी माझ्या आयुष्याची 10 वर्षे हनी सिंगला साथ दिली. मी सर्व काही सोडून त्याच्या पाठीशी उभी राहिले. आता त्याने मला सोडलं आहे.” असा हुंदकाच शालिनीने कोर्टरूममध्ये फोडला.

प्रसिद्ध पॉप सिंगर हनी सिंग यांच्याविरोधात दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणी सुनावणीला हनी सिंग अनुपस्थित राहिला. त्याची तब्बेत ठीक नसल्याचं कारण त्याच्या वकिलांनी दिलं. यावरून न्यायालयाने हनी सिंगला चांगलंच फटकारलं आहे.दंडाधिकाऱ्यांनी हनी सिंगला न्यायालयात हजर न राहणे आणि उत्पन्नाशी संबंधित प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मॅजिस्ट्रेटने हनी सिंगची पत्नी शालिनीला विचारलं, “आता तुम्हाला कोर्टाकडून काय हवं आहे? तुमच्या दोघांमधील पती-पत्नीच्या नात्याची स्थिती काय आहे? तुमच्या दोघांमधील प्रेम कुठे हरवले आहे?” यावर शालिनी उत्तर देत न्यायाधीशांना म्हणाल्या, “हे प्रकरण मिटलं तर चांगलं होईल.”

 

काय आहे प्रकरण?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. हनी सिंगने दोघांच्या (पतिपत्नी यांची संयुक्त मालकी असलेली संपत्ती) नावावर असलेली मालमत्ता विकली आणि इतकंच नाही तर त्याने मानसिक छळ केल्याचा आरोप शालिनीने तक्रारीमध्ये केला आहे. या प्रकरणात त्याच्या पत्नीने 10 कोटी रुपयांची भरपाई देण्याची देखील मागणी केली आहे.

 

आज काय झालं ?

हनी सिंगच्या वकिलांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याचं कारण देत तो सुनावणीला अनुपस्थित असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे पुढच्या सुनावणीला तो आवर्जुन हजर राहील, असं आश्वासन देखील हनी सिंगच्या वकिलांनी दिलंय. यावरून न्यायालयाने हनी सिंहला चांगलंच फटकारलंय. यावर न्यायालयाने हनी सिंगचे मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. त्यामुळे हनी सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होणार असं चित्र दिसतंय.

आणखी वाचा : Honey Singh Accused: घरगुती हिंसाचार प्रकरणी कोर्टाने हनी सिंगला फटकारलं, सुनावणीला गैरहजर राहिल्याने अडचणीत वाढ

सुनावणी दरम्यान हनी सिंगच्या वकिलांनी या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. सुनावणीसाठी हनी सिंगच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर बोलताना ‘कोणीही कायद्यापेक्षा वर नाही’ असं देखील न्यायालयाने म्हटलं. यावर हनी सिंगच्या वकिलांनी न्यायालयाला विश्वास दाखवत हनी सिंग लवकरात लवकर न्यायालयात वैद्यकीय अहवाल आणि आयकर विवरणपत्र सादर करेल, असं म्हटलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.