मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. यामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अनेक रात्री तुरुंगात काढाव्या लागत आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर आज (२८ ऑक्टोबर) होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली तर पुढील १५ दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्यन खानला पाठिंबा देताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन खानच्या सुनावणीबाबत बोलले जात आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘जर हे सत्य असेल तर खरंच अतिशय वाईट आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा: रणबीर आणि आलिया कधी करणार लग्न? सोनी राजदान म्हणतात…

यापूर्वी देखील हृतिक रोशनने आर्यन खानचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने, ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

आतापर्यंत नेमकं काय झालं?

२ ऑक्टोबरला एनसीबीनं मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण ८ लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर काल (२७ ऑक्टोबर) सुनावणी झाली. दुसरीकडे एनडीपीएस न्यायालयात देखील या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीमध्ये दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.