‘हुतूतू’ तांबड्या मातीतला अस्सल मराठमोळा खेळ. खेळ तसा जुनाच, पण रोज नव्याने, नव्या मातीवर रंगणारा. कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘हुतूतू’ या मराठी सिनेमात खेळाचा आखाडा नसला तरी नात्यांची अनोखी धोबीपछाड अनुभवायला मिळणार आहे. नाती रक्ताची असो वा मनाने गुंतलेली त्यात प्रेमाचा ओलावा असेल तर ते कुठेही आणि कधीही फुलून येते. नातेसंबंधातील अशाच भन्नाट डावपेचावर बेतलाय ‘हुतूतू’ हा धम्माल विनोदी चित्रपट. हर्षवर्धन भोईर व भाऊसाहेब भोईर निर्मित हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तत्पूर्वी यातील सुरेल गीतांची ध्वनीफित विधान परिषदेचे उपसभापती मा. श्री. वसंत डावखरे यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी मा. शर्मिला ठाकरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. विजय कोंडके यांच्यासह चित्रपटातील कलाकार- तंत्रज्ञ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
अशोक सराफ, वर्षा उसगांवकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, अनंत जोग, प्रदीप पटवर्धन, जयवंत भालेकर,अतुल तोडणकर, संजय खापरे आणि कांचन अधिकारी अशा अभिनय संपन्न कलाकारांची तगडी फौज या सिनेमात एकत्र आली आहे.खेळ आणि जीवन यात बऱ्याचदा साम्य पहायला मिळतं. त्याग, समर्पणाला प्रेम मानणाऱ्या जुन्या पिढीचा एक संघ आणि प्रेम मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या नव्या पिढीचा दुसरा संघ. दोन पिढ्यांतील हा संघर्ष ‘हर्ष फिल्मस’ निर्मित ‘हुतूतू’ सिनेमातून आपल्यासमोर विनोदी ढंगात उलगडणार असून आशिष पाथरे यांनी त्याचे लेखन केलंय. बऱ्याच कालावधीनंतर कांचन अधिकारी या चित्रपटातून अभिनय करताना दिसणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2014 रोजी प्रकाशित
प्रेमाच्या मैदानात रंगणार ‘हुतूतू’चा सामना
कांचन अधिकारी दिग्दर्शित 'हुतूतू' या मराठी सिनेमात खेळाचा आखाडा नसला तरी नात्यांची अनोखी धोबीपछाड अनुभवायला मिळणार आहे.

First published on: 12-05-2014 at 10:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hututu movie music launch