अभिनेत्री कंगना रणौत होस्टिंग करत असलेला ‘लॉक-अप’ रिअलिटी शो मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये कोण सहभागी होणार तसेच शोचं स्वरुप कसं असणार आहे. या सर्वच गोष्टींचा सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच आता या शो कायदेशीर अडचणीत अडकल्याचं बोललं जातंय. एकीकडे असा शो प्रेक्षकांनी याआधी कधीच पाहिला नसेल असा दावा मेकर्स करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शोच्या विरोधात एका बिझनेसमनने तक्रार दाखल केली आहे.
हैदराबाद येथील बिझनेसमन सनोबर बेग यांच्या म्हणण्यानुसार हा शो त्यांची रजिस्टर्ड संकल्पना ‘द जेल’वर हा शो आधारित आहे. त्यांनी या शोची संकल्पना एंडेमोल शाइन इंडियाच्या अभिषेक रेगे यांच्यासोबत शेअर केली होती. मात्र फसवणूक करुन त्याची ही संकल्पना चोरल्याचं सनोबर बेग यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या दिवाणी न्यायालयानं लॉकअपच्या मेकर्सना या शोचं स्ट्रिमिंग कोणत्याही प्लॅटफॉर्मवर न करण्याचे आदेश दिले आहेत.
सनोबर बेग यांनी सांगितलं की, ‘एका आठवड्यापूर्वी जेव्हा मी या शोचा प्रोमो पाहिला तेव्हाच मी न्यायालयात धाव घेतली. निर्मात्यांनी केवळ माझी संकल्पनाच चोरलेली नाही तर त्यांनी जेलरपासून ते सेट डिझाइन पर्यंत सर्वच गोष्टी कॉपी केल्या आहेत. सध्या दिवाणी न्यायालयानं शोच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. मी लढण्यासाठी तयार आहे. न्याय मिळवण्यासाठी मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं तरीही चालेल.’
दरम्यान ‘लॉकअप’च्या निर्मात्यांचा दावा आहे की, अशाप्रकारचा शो प्रेक्षकांनी आतापर्यंत कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहिला नसेल. हा एक सेलिब्रेटी रिअलिटी शो असणार आहे. ज्यात एकूण १६ सदस्य, ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद असणार आहेत. या शोचं होस्टिंग अभिनेत्री कंगना रणौत करणार आहे. त्यामुळेच हा शो सध्या सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे.