सलमान आणि रणबीरच्या मैत्रीमध्ये असलेली धुसफूस त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातही असल्याचे दिसते. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा ‘तमाशा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी हे दोन्ही कलाकार चित्रपटाची जमेल त्या मार्गाने प्रसिद्धी करत आहेत. असे असताना बिग बॉसचा मंच वगळून कसा चालेल. बिग बॉसमधून जी प्रसिद्धी मिळू शकते ती इतर कोणत्याही मंचावरून मिळणा-या प्रसिद्धीपेक्षा नक्कीचं जास्त असेल. पण, यंदा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दीपिकाला एकटेच जावे लागले.
झाले असे की, तमाशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दीपिका पदुकोण ‘बिग बॉस’ या रिएलिटी शोवर एकटीच गेली होती. मुख्य म्हणजे या शोचे सूत्रसंचालन करतो ते बॉलीवूडचा दबंग सलमान खान. सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना ही आता रणबीरची तथाकथित प्रेयसी आहे. त्यामुळे बहुधा सलमान-रणबीरमध्ये काही आलबेल आहे असे वाटत नाही. कदाचित याच कारणामुळे रणबीरने बिग बॉसच्या मंचावर जाणे टाळले. जेव्हा रणबीरला याबाबत विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, ‘बिग बॉस’मधून चित्रपटाची खूप चांगली प्रसिद्धी होऊ शकते असा दीपिका आणि मार्केटिंग टीमचा विचार होता. पण, माझी काही वैयक्तिक कारण होती त्यामुळे मी तिथे नाही जाऊ शकलो.
रणबीरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या ‘सावरिया’ या चित्रपटात सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. त्यानंतर रणबीर आणि कतरिनाची प्रमुख भूमिका असलेला अजब ‘प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटातही तो झळकला होता. सलमान आणि कतरिनाच्या मैत्रीत सर्वकाही आलबेल आहे तशीचं सलमान-रणबीरची मैत्रीही रहावी अशी आशा करुया.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
वैयक्तिक कारणामुळे मी सलमानच्या बिग बॉसमध्ये नाही गेलो- रणबीर कपूर
चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दीपिकाला बिग बॉसच्या मंचावर एकटेच जावे लागले.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 24-11-2015 at 12:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I didnt go to salman khans bigg boss 9 for personal reasons says ranbir kapoor