अमोल पालेकर यांचे मनोगत
‘बनगरवाडी’ चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याच कलाकृतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारे व्यंकटेश माडगूळकर यांना मी अनुभवले. सशक्त लेखनशैली आणि मोकळे व्यक्तिमत्त्व असलेल्या तात्यांकडून मी खूप काही शिकलो, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केली. पडद्यावर हलणारे चित्र आणि उलगडणारी गोष्ट याच्या पलीकडे जाऊन आपण चित्रपट पहात नाही, ही माझी खंत आहे असेही पालेकर यांनी सांगितले.
व्यंकटेश माडगूळकर प्रतिष्ठान, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात पालेकर बोलत होते. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, अभिनेत्री अधिश्री अत्रे आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्ञानदा नाईक या वेळी व्यासपीठावर होत्या. पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बनगरवाडी’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता झाली. त्यापूर्वी सकाळी माडगूळकर यांची पटकथा-संवाद असलेला ‘सांगत्ये ऐका’ चित्रपट दाखविण्यात आला.
‘बनगरवाडी’ कादंबरीवर चित्रपट निर्मितीच्या झालेल्या प्रयत्नांची माहिती ज्ञानदा नाईक यांनी प्रास्ताविकात दिली. तोच धागा पकडून पालेकर म्हणाले, अनेक दिग्गजांकडून वेगवेगळ्या कारणांनी नाकारलेली ‘मुलगी’ माझ्याकडे आली याची जाणीव असल्याने माझ्यावर दडपण होते. ‘बनगरवाडी’ ही सर्वात जास्त भाषांमध्ये अनुवादित असलेली मराठी कलाकृती पडद्यावर उभी करताना मी कुठे कमी पडणार नाही ना, असेही वाटत होते. चित्रपटाच्या पटकथेचा आराखडा तात्यांकडे तयार होता. तो वाचल्यानंतर काही गोष्टी मला न आवडलेल्या होत्या. मात्र, हे तात्यांना सांगायचे कसे हेदेखील पडपण होते. एकदा मी त्यांना सांगितले तेव्हा ‘मग तू दुसऱ्याकडून लिहून घे’, असा मोठेपणा त्यांनी दाखविला होता. त्यामागे त्यांचे कलात्मकतेचे भान जागे असल्याचे मला जाणवले. ‘मी तुमच्याकडूनच लिहून घेईन’ असे सांगितले तेव्हा तात्यांनी लगेच मान्यता दिली. त्यांच्या आराखडय़ातून कोणते प्रसंग गाळायचे आणि कोणत्या प्रसंगांचे पुनर्लेखन करायचे हे आम्ही दररोज कार्यालयीन कामकाज करावे तशा पद्धतीने बसून ठरवत असू. आपल्याच सक्षम कलाकृतीकडे तिऱ्हाईतपणाने कसे पहायचे हे मी त्यांच्याकडून शिकलो. चित्रपटाच्या मुहूर्ताचा ‘क्लॅप’ देण्यासाठी तात्या चित्रीकरण स्थळी आले होते.
१९७८मध्ये मी भारती निवास सोसायटीत राहिले. तेव्हा फारसा गजबजाट नसलेल्या या परिसरातील बंगले आणि वृक्षराजी न्याहाळण्याचे भाग्य लाभले. ‘अक्षर’ या बंगल्याशी स्नेह जुळला. तात्यांचे वास्तव्य असलेल्या रस्त्याला व्यंकटेश माडगूळकर रस्ता हे नाव देण्याचे भाग्य मला लाभले, असे माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. मोहन माडगूळकर यांनी आभार मानले.