अभिनेत्री इलियाना डिक्रूझने २०१२ मध्ये ‘बर्फी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. बॉलीवूडमध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आता इलियाना तिचा पती मायकेल डोलन आणि तिच्या दोन मुलांसह टेक्सासमध्ये कौटुंबिक जीवन जगत आहेत.

अलीकडेच इलियाना डिक्रूझ ‘दो और दो प्यार’ चित्रपटात दिसली होती. अभिनयात रस असलेली इलियाना पापाराझींपासून दूर राहिली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत इलियाना तिच्या मुलांच्या बाबतीत बोलली आहे. इलियाना पापाराझींना तिच्या मुलांचे फोटो काढू का देत नाही याबद्दल बोलली आहे.

इलियाना म्हणाली, “मुलांबरोबर फोटो काढणे कठीण आहे. मुलांसाठी ते गोंधळात टाकणारे आहे. हे त्यांच्यासाठी अन्याय आहे, कारण त्यांना काय चालले आहे ते समजत नाही. मी मुलांचे फोटो काढण्याच्या बाजूने नाही.’ इलियानाला चिंता आहे की तिची मुले, जी अजूनही खूप लहान आहेत, त्यांना सतत पाठलाग करणे आणि फोटो काढणे हे पूर्णपणे समजणार नाही.

इलियानाने तिच्या कारकिर्दीतील मुंबईच्या पापाराझींबरोबर तिच्या सकारात्मक अनुभवांबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “माझे मुंबईच्या पापाराझींशी चांगले संबंध आहेत आणि मी जेव्हा जेव्हा त्यांना सांगितले आहे की, ‘ऐका, मला आरामदायी वाटत नाहीये, कृपया फोटो काढू नका’, तेव्हा त्यांनी माझ्या इच्छेचा खरोखर आदर केला आहे. त्यामुळे जरी असे काही झाले तरी मला वाटते की ते समजून घेतील आणि मुलांचे फोटो काढणार नाहीत.”

२०२३ मध्ये इलियाना झाली आई

इलियाना डिक्रूझच्या जोडीदाराचे नाव मायकेल डोलन आहे. त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं, असं म्हटलं जातं. पण, इलियाना किंवा मायकेलने याबद्दल कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही. इलियानाने ती आई होणार असल्याची घोषणा केल्यावर तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तिने जोडीदार मायकेल डोलनचे काही फोटो शेअर केले होते. हे दोघेही ऑगस्ट २०२३ मध्ये आई-बाबा झाले. १९ जून २०२५ रोजी या जोडप्याने त्यांचा दुसरा मुलगा, कीनू राफे डोलनचे स्वागत केले. इलियाना अनेकदा तिच्या मुलांचे व पतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

इलियानाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची ‘दो और दो प्यार’ या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी व सेंधिल राममूर्ती हे कलाकार होते. हा चित्रपट सध्या डिस्ने+ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.